काँग्रेसमध्ये राहून वेगळी चूल मांडता येणार नाही. संघटना, समिती स्थापन करता येणार नाही. काँग्रेस पक्षाच्या झेंडय़ाखाली आंदोलन, मोर्चे काढावे लागतील अन्यथा घरी बसा, असा सज्जड दम काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी आमदार सुभाष झांबड यांना दिला आहे. काही दिवसांपूर्वी झांबड यांनी जनआंदोलन विकास समिती स्थापन करून शहरातील रस्त्यांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर केले होते. या पाश्र्वभूमीवर सत्तार यांनी झांबडांना चांगलेच फटकारले. औरंगाबाद येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने ४ ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्यात येणार असून, त्याच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला जनआंदोलन विकास समितीचे कार्यकर्ते गैरहजर होते.  जनआंदोलन विकास समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र दाते पाटील यांची नियुक्ती करताना आमदार झांबड यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा एक गट या समितीमध्ये घेतला होता. विशेषत: माजी शहराध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम यांच्या जवळील कार्यकर्त्यांना या समितीत स्थान देण्यात आले होते. आमदार झांबड यांनी समितीची भूमिका स्पष्ट करताना यात सर्वपक्षीयांना सामावून घेतले जाईल, असे म्हटले होते. पक्षाच्या वरिष्ठांना न विचारताच समिती स्थापन करण्याचा हा निर्णय जिल्हाध्यक्ष सत्तार यांना आवडला नसल्याने त्यांनी झांबड यांचा चांगलाच समाचार घेतला. ‘ही समिती ब्लॅकमेलिंग करण्यासाठी तयार करण्यात आली आहे’ असे सांगत सत्तार यांनी आमदार झांबड यांची प्रदेशाध्यक्षाकडेही तक्रार केल्याचे सांगितले.

काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हय़ातील खराब रस्ते, संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानात वाढ करावी, शेततळय़ांचे व विहिरींचे अनुदान मिळावे, अखंड १२ तास वीजपुरवठा करावा, आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीस माजी आमदार डॉ. कल्याण काळे, जि.प.चे अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी अध्यक्ष केशवराव औताडे, प्रकाश मुगदिया, नितीन पाटील, किरण डोणगावकर, सरोज मसलगे, रेखा जैस्वाल आदींची उपस्थिती होती.