मोदी सरकारने गाजावाजा करत सुरु केलेल्या ‘मेक इन इंडिया’ योजनेवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जोरदार टिकास्त्र सोडले. सरकारने सुरु केलेली ही योजना ‘मेक इन इंडिया नव्हे, तर ‘फेक इन इंडिया’ असल्याचे ते म्हणाले. याशिवाय सिंचनाचा मुद्दा पुढे करत भाजप सरकारकडून राजकीय सौदेबाजी केली जात आहे, असा आरोपही त्यांनी औरंगाबादेत केला.

राज्य सरकारचा कारभार निजामाच्या राजवटीपलीकडचा आहे. कर्जदार राज्याच्या यादीत महाराष्ट्र सरकार अव्वल स्थानी येईल, अशी स्थिती सरकारने निर्माण केली आहे, अशी टीका चव्हाण यांनी यावेळी केली. सिंचनाच्या प्रश्नाला केंद्रबिंदू करत भाजप सत्तेवर आली. सिंचन क्षेत्राची चौकशी सुरु आहे. त्याला आमचा विरोध नाही. मात्र या मुद्द्याचा राजकीय सौदेबाजीसाठी उपयोग केला जात असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे. त्यामुळे सरकारन यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी चव्हाणांनी केली.

सिंचन घोटाळ्याचे आरोप झालेल्या मंत्र्यांविरोधात सरकारने कारवाई केलेली नाही. त्यामुळे हे ‘क्लीन चिटर’ सरकार आहे. असेही ते म्हणाले. भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर देखील त्यांनी निशाणा साधला. शिवसेनेची स्थिती केविलवाणी आहे. त्यांची विश्वासार्हता संपली असून ते सत्तेत आहेत की बाहेर हे त्यांनाच कळेनास झालंय, असा टोलाही त्यांनी लगावला. याशिवाय ८ नोव्हेंबर हा नोट बंदीचा दिवस काँग्रेस काळा दिवस म्हणून साजरा करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.