अनेक मातबरांना न.प.चे दरवाजे बंद, तर काही जुने चेहरे सभागृहात

येथील तीन नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्यास एमआयएमचा हातभार लागल्याने कळमनुरी, वसमतमध्ये शिवसेना, तर िहगोलीत भाजपला नगराध्यक्षपद मिळाले. वसमतमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा झाली. त्यांचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर राहिला. िहगोलीत अनेक मातबरांना न.प.चे दरवाजे बंद झाले. तर सभागृहात जुन्या काही चेहऱ्यांना परत संधी मिळाली आहे.

जिल्ह्यात िहगोली, कळमनुरी, वसमत नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कळमनुरी, िहगोलीतील काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आली. तर वसमतमध्ये आमदार डॉ. मुंदडा यांनी शिवसेनेचा गड राखला. झालेल्या निवडणुकीत कांग्रेस, राष्ट्रवादीचा घात झाला. या दोन्ही पक्षाला सत्तेबाहेर ठेवण्यात एमआयएमचा हातभार लागला. कळमनुरीत गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेसची एकहाती सत्ता होती. येथील निवडणुकीत एमआयएमने आपला उमेदवार बाशिद नाईक उभा केला होता. त्याच्या विजयासाठी आ. अकबरोद्दीन ओवेसी यांनी शहरात प्रचारफेऱ्या केल्या. तर खा. असुदोद्दीन ओवेसी यांची प्रचारसभा झाली आणि पार वातावरण बदलून गेले होते.

भारतीय जनता पक्षाने अध्यक्षपदासाठी गजानन डहाळे यांना उमेदवारी दिली. त्याच्या विजयासाठी बरीच मेहनत घेऊनही भाजपला मात्र नगरपालिकेच्या निवडणुकीत खाते उघडण्यात यश आले नाही. शिवसेनेचे माजी आमदार गजाननराव घुगे यांनी शिवसेनेसाठी संपूर्ण प्रचाराची यंत्रणा एकहाती चालवून त्यांचे उमेदवार उत्तम िशदे यांना विजयी करण्यात यश मिळविले.

खासदार राजीव सातव व आमदार डॉ. संतोष टारफे यांची नगरपालिकेवर १५ वर्षांची एकहाती सत्ता होती. या वेळी सातव यांनी निवडणूक प्रचाराची धुरा आमदार टारफे यांच्या स्वाधीन केली. मात्र काँग्रेसला केवळ तीनच जागेवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे उत्तमराव िशदे यांना ४ हजार ४, काँग्रेसचे कादरी मुजफरोद्दीन यांना ३ हजार ८५७, एमआयएमचे बाशिद नाईक यांना २ हजार ३४५, राष्ट्रवादीचे हुमायून नाईक यांना १ हजार ३२६ मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवाराचा केवळ १४७ मतांनी पराभव करून सेना उमेदवाराच्या गळय़ात विजयाची माळ पडली.

वसमत येथे राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यात समाजवादी पार्टी महत्त्वाची ठरली. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे उमेदवार महेश भिसे यांच्या निवडणूक प्रचारासाठी सभा घेतली. येथे भाजपचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर राहिला. शिवसेनेचे विजयी उमेदवार श्रीनिवास पोरजवार यांनी ८ हजार ६७१, राष्ट्रवादीचे यशवंत उभारे यांनी ७ हजार ३१७, भाजपचे महेश भिसे ६ हजार ४९७, काँग्रेसचे प्रशांत गायकवाड ५ हजार ९६४, तर समाजवादी पार्टीचे उमेदवार शेख अजहर यांनी ५ हजार ४५६, अपक्ष वसंत चेपुरवार १ हजार ६  मते घेतली. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा शिवसेनेच्या उमेदवाराने १ हजार ३५४ मतांनी पराभव केला. येथे विद्यमान आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेनेची सत्ता राखण्यात यश मिळविले.

िहगोली नगरपालिकेच्या निवडणुकीत जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे ठाण मांडून बसले होते. भाजपला नगराध्यक्षपद मिळविण्यात यश आले. परंतु सभागृहात या सत्ताधारी पक्षाला तीन सदस्यांवर समाधान मानावे लागले.  बत्तीस सदस्यसंख्या असलेल्या सभागृहात राष्ट्रवादीला १३, काँग्रेस-शिवसेनेला प्रत्येकी ६, मनसे २, अपक्ष १, तर एमआयएमला येथे खाते उघडण्याची संधी मिळाली.

या नगरपालिकेत मातबर उमेदवार सुरेखा शरद जैस्वाल, शंभुसिंग गहिलोत, शेख बुऱ्हाण पहेलवान, जगजितराज खुराणा, शेख शकील यांसारख्या काही मातबर उमेदवारांना नगरपालिकेचे दरवाजे बंद झाले. तर सभागृहात काही जुने नगरसेवक परत बसणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप चव्हाण सहाव्यांदा निवडून आले. जितसिंग साहू, मावळत्या नगराध्यक्ष अनिता सूर्यतळ, खय्युम खाँ पठाण, वसंताबाई लुंगे, सय्यद अमेरअली, प्रीती अग्रवाल, गणेश बांगर, श्रीराम बांगर, शेख निहाल, शेख आरेफ, सुनील भुक्तर यांचा समावेश आहे. झालेल्या निवडणुकीत भाजपच्या सुरेखा जैस्वाल व त्यांचे पुत्र अपक्ष उमेदवार अंकुश जैस्वाल या दोघांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे शेख शकील यांचा प्रभाग १२ मधून त्यांची पत्नी शेख नाजेमाबेगम यांचा प्रभाग क्र. ६ मध्ये पराभव झाला.