‘इंदू सरकार’ चित्रपट चुकीच्या पद्धतीने निर्माण करण्यात आला असल्याचा आरोप करत औरंगाबादमध्ये सरकार आणि मधुर भांडारकर यांच्या विरोधात निदर्शन करण्यात आली. ‘इंदिराजी के सन्मान मे काँग्रेस मैदान में’ असा नारा देत आगामी ‘इंदू सरकार’ हा चित्रपट रद्द करावा, अशी मागणी यावेळी काँग्रेसकडून करण्यात आली.  मधुर भांडारकर हा भाजपचा चमचा आहे. त्यामुळे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याबद्दलही काही दिवसांपूर्वी असंच वादग्रस्त लिखाण केलं होते. देशातील थोर व्यक्तींच्या नावाने वादग्रस्त मत व्यक्त करून प्रसिद्धी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याला भाजपची साथ आहे, असे आरोप करत चित्रपटावर बंदी घालावी, या मागणीसाठी औरंगाबाद जिल्हा काँग्रेसच्यावतीन क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली.

चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी गांधी परिवाराला दाखवा, त्यांची परवानगी दिली तरच तो औरंगाबादमध्ये प्रदर्शित करण्याची परवानगी देऊ अन्यथा तो बंद पाडू, असा इशाराही यावेळी देण्यात आला. तसेट चित्रपट रद्द करावा, याबाबत विभागीय आयुक्त यांना काँग्रेसकडून निवेदन देण्यात आले. ‘इंदू सरकार’ हा चित्रपट १९७५ ते १९७७ या काळातील देशातील आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आला आहे. चित्रपटाचे कथानक हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी यांच्या व्यक्तिरेखवर आधारित आहे.