‘बाप-लेक आम्ही दोघेही सकाळपासून कामगार चौकात येऊन बसतो आहोत. दुपापर्यंत बसून अखेर घराचा रस्ता पकडायचा. दीड महिन्यांपासून हाताला काम नाही. पाऊस जसा थांबला तशी परिस्थिती बिकट बनली’, सुरेश बारस्कर हा तरुण सांगत होता. अशीच व्यथा वैजयंती राठोड यांचीही. त्या व त्यांचे पती दोघेही कामगार. ‘काम नसल्यामुळे खायचेही वांदे झाले आहेत, लेकरा-बाळांना कसं जगवावं, या चिंतेने जीव नकोसा झाला आहे’ खिन्न स्वरात वैजयंती सांगत होत्या. वैजयंती व सुरेश यांचीच ही जगण्याची कसरत दर्शवणारी परिस्थिती नाही तर किमान पाचशे ते सातशे पुरुष-महिलांची आहे. ही मंडळी हाताला काम मिळेल, या आशेने दररोज कामगार चौकात जमा होतात आणि दुपारनंतर रित्या हातांनी घरी परततात. येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर काय भीषण परिस्थिती उद्भवू शकते, याची चाहुल सांगणारे चित्र. शेतीत काम नाही आणि बांधकाम व्यवसायही मंदीत असल्यामुळे कामगार वर्गाची जगण्याची कसरत सुरू आहे.

औरंगाबादच्या सिडको भागातील कामगार चौकात सकाळी सातपासून बांधकाम मिस्त्री, खोदाई करणारे, प्लंबर, पेंटर, अशी कामे करणारे तरुण, ज्येष्ठ पुरुष, महिला असे हजार ते बाराशे जण जमलेले दिसतात. एखादा दुचाकी, चारचाकीत बसून येऊन थांबला तर त्याच्याभोवती गराडा घालून काय काम आहे, अशी विचारणा करताना दिसतात. याशिवाय कंत्राटदार, स्थापत्य अभियंता, बांधकाम निरीक्षक येईल आणि एखादे काम आहे म्हणून घेऊन जातील, या आशेवर वाट पाहात बसलेले दिसतात. दुपापर्यंत. त्यापैकी एखाद्याला विचारले तर, आता कामाची वाट पाहणे एवढेच काम उरले आहे, असं काहीशा उद्विग्नतेने सांगतात. त्यात रेराच्या कायद्यामुळे बांधकामाच्या व्यवसायावरही बराच परिणाम झाला आहे. शहरातील मिस्त्री, गवंडी यांच्या हातचे काम सध्या थांबले आहे. प्रकाश दाभाडे सांगतात की, पावसाअभावी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतक ऱ्यांना शेत तरी असते. आमचे पोट हातावरचे. त्यामुळे आम्ही तर आत्महत्याही करू शकत नाहीत. ग्रामीण भागातील रोजगार हमीची कामे थांबल्यामुळे ते सर्व शहरात येत आहेत. पण येथेही काम उरले नाही. साठीकडे झुकलेल्या येणूबाई पगारे या सांगतात, आठ-आठ दिवस कामाविनाच सरतात. एका दिवसाच्या कामावर हप्ताभर रेटावा लागतोय. तिनशे रुपयांची मजुरी महिलांना मिळतेय. त्यातच कुटुंबाची गुजराण करावी लागते. असे किती दिवस काढावी लागतील, असा येणूबाईंचा प्रश्न निरुत्तर करणारा.

apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार
municipal administration not in favour of cut water even lowest water storage in mumbai lakes
पाणीकपातीची गरज नाही! महापालिका प्रशासनाची भूमिका