शरद पवार यांची टीका

सर्वसामान्य माणसाला सामूहिक शक्ती उपलब्ध करून देणारे सहकार हे माध्यम आहे. मात्र, सूत्र समजून न घेता एखादा निर्णय घेतला की काय होते हे नोटाबंदीच्या निर्णयातून दिसून आले. जिल्हा बँका आणि राज्य बँकांना चलन पुरवठा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा द्यावा लागला. तो निर्णय जरी सहकारी बँकांच्या बाजूने झाला असला तरी आता पुरसे चलन मिळत नसल्याने सहकाराची वाताहत होत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. औरंगाबाद येथे आयोजित सहकार परिषदेमध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांची उपस्थिती होती.

सहकार क्षेत्राचा १८ व्या शतकातील इतिहास, राज्यात त्याची त्यानंतर झालेली वाढ, त्यासाठी वैकुंठभाई मेहता यांनी केलेले प्रयत्न, धनंजयराव गाडगीळ यांचे मार्गदर्शन असा सहकाराचा आढावा घेत शरद पवार यांनी सहकार आणि नोटाबंदी यावर भाष्य केले. काळा पैसा बाहेर काढण्याला कोणाचा विरोध नाही. मात्र, घेतलेल्या निर्णयानंतर त्यांची अंमलबजावणी करताना अनेक चुका झाल्याचे सांगत या निर्णयाचा सहकाराला कसा फटका बसला याची माहिती दिली. राज्य शिखर बँकेसह राज्यातील सहकारी बँकांकडे ८ हजार ६०० कोटी रुपये जमा झाले होते. त्यानंतर सहकारी बँकांवर र्निबध घालण्यात आले. परिणामी व्यवहार ठप्प झाले. त्यानंतर अर्थमंत्र्यांशी चर्चा केली. शेवटी सर्वोच्च न्यायालयात काही बँकांना जाण्यास सांगितले. ते प्रकरण न्यायालयात पी. चिदंबरम यांनी चालविण्यासाठी विनंती केली. सर्वोच्च न्यायालायाने व्यवहार सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अजूनही चलन पुरेसे नसल्याने जिल्हा बँकेतच पैसा नाही. त्यामुळे विविध कार्यकारी सोसायटय़ांपर्यंत तो कसा पोहोचेल, असा सवाल करत सूत्र समजून न घेता एखादा निर्णय घेतला तर काय होते, हे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. केवळ ७५ हजार कोटी रुपये रिझव्‍‌र्ह बँकेकडे कमी आल्याने नोटाबंदीचा निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे करत पवार यांनी या निर्णयाचा फटका सहकार क्षेत्राला मोठय़ा प्रमाणात बसल्याचे सांगितले. परिणामी सामूहिक शक्तीचे हे माध्यम दुर्मिळ होईल व सामान्य माणूस केंद्रबिंदू असलेल्या सहकारी संस्थांची वाताहत होईल, असेही पवार म्हणाले. त्यांच्या भाषणापूर्वी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खरे यांनीही नोटाबंदीच्या सरकारच्या निर्णयावर टीका केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे हाल झाल्याचेही त्यांनी सांगितले. संसदेच्या वित्त समितीचा सदस्य या नात्याने रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरला विचारण्यासाठी प्रश्न तयार केल्याचीही माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना अध्यक्ष म्हणून नोटाबंदीवर पवारांची टीका ऐकून घ्यावी लागली. त्यांच्या भाषणाच्या वेळी बरेच लोक निघून गेले.

पंतप्रधान पवार म्हणत खासदार खरेंची सारवासारव

खासदार खैरेंनी नेहमीप्रमाणे भाषणाला सुरुवात केली ‘छत्रपतीं शिवप्रभूंना अभिवादन करून’ असे म्हणत खैरेंनी देशाचे पंतप्रधान शरद पवार असा उल्लेख केला. आपला उल्लेख चुकला आहे, हे कळण्याच्या आतच खालून हशा पिकला. खैरेंनी स्वत:ला सावरले. चुकून बोलून गेलो हो, असे ते म्हणाले आणि सभागृहात पुन्हा हशा पिकला. शेवटी स्वत:च्या चुकीला सावरण्यासाठी ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही पंतप्रधान म्हणून पवार मान्य होते. पवारांची स्तुती करत आणि नोटाबंदीवर टीका करत खैरेंनी भाषण पूर्ण केले.