महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या करसहायक परीक्षेत कॉपी करण्यासाठी ई-मेलद्वारे प्रश्नपत्रिका मागवून फोनद्वारे उत्तरे सांगणाऱ्या विठ्ठल धनसिंग घोलवाल (वय २३, रा. हसनाबादवाडी, ता. औरंगाबाद) यास अटक केली. वर्धा येथे या विषयाची परीक्षा देणाऱ्या अनिल ऊर्फ अरुण केसरसिंग जोनवाल (वय २४, रा. लांडकवाडी, ता. जि. औरंगाबाद) यास मदत केल्याच्या आरोपावरून पाच जणांना अटक करण्यात आली. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये दाखविण्यात आलेला कॉपीचा प्रकार प्रत्यक्षात उतरल्याचे या घटनेमुळे पुढे आले आहे.

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास राठोड यांचा लॅपटॉप मदन बमनाथ याने नेला होता. २६ ऑगस्ट रोजी नेलेला लॅपटॉप त्यांनी २८ ऑगस्ट रोजी परत आणून दिला. या वेळी लॅपटॉपच्या ई-मेलवर काही प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांचे फोटो दिसल्याने डॉ. राठोड यांना संशय आला. त्यांनी याबाबतची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिली. त्यानुसार सायबर गुन्हे शाखेने फिर्याद दाखल करून ई-मेलचे तांत्रिक विश्लेषण केले. त्या विश्लेषणाच्या आधारे मदन बमनाथ यांचा मेहुणा संदीप धनसिंग घोलवाल व लखनसिंग देवीसिंग देडवाल या दोघांनी करसहायक परीक्षेत बसलेल्या विठ्ठल धनसिंग घोलवाल याच्याकडून ई-मेलद्वारे प्रश्नपत्रिका मागवली. वर्धा येथील परीक्षा केंद्रावरून मोबाइल स्पाय कॅमेऱ्याने त्याने प्रश्नपत्रिका पाठवली. या प्रश्नपत्रिकेची उत्तरे घोलवाल परीक्षार्थी अरुण जोनवाल यास सांगत होता. तो ब्लू टूथने ते ऐकत होता. या प्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून, बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम शेख तपास करीत आहे.