कचरा डेपोवर कचरा टाकू न देण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. शासकीय दवाखाने तसेच शहरातील मोकळ्या जागेतील परिसरात सर्रास कचराकुंड्या दिसत आहेत. दिवाळीपूर्वी कचऱ्याचा प्रश्न सुटला नाही, तर दिवाळी कचऱ्यात जाईल. त्यामुळे सिडको परिसरातील भाजप नगरसेवक दामूअण्णा शिंदे यांनी वॉर्डातील कचरा पेट्रोल टाकून पेटवून दिला.

आणखी दोन दिवस शहरातील कचरा उचलला नाही, सर्वत्र साचलेले कचऱ्याचे ढिग वाढत आहेत. त्यामुळे वॉर्डात दुर्गंधीचे साम्राज्य पसरण्याची चिन्हे दिसत आहेत.  ते टाळण्यासाठी कचरा रस्त्यावरच जाळून टाकला, असे  शिंदे यांनी सांगितले. धुरामुळे प्रदूषण होत आहे. मात्र पुढील गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी हा त्रास सहन करावा, असे आवाहनही त्यांनी वॉर्डातील नागरिकांना केले. खासगी वाहनातून कचरा हलवण्याचा विचार केला होता. पण तो कचरा टाकायचा कुठे हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे अखेर रस्त्यावर कचरा जाळण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.

मांडकी शिवारातील नारेगाव कचरा डेपोत शहरातील कचरा टाकला जातो. गेल्या ३५ वर्षांपासून त्याच ठिकाणी कचरा टाकला जात आहे. त्यामुळे ४६ एकर जमिनीवर ३० ते ३५ फुटांचे डोंगर तयार झाले आहेत. कचऱ्याची दुर्गंधी, कचरा डेपो भोवताली कुत्र्यांनी मांडलेला उच्छाद, हवा, पाणी प्रदूषण यामुळे डेपोच्या आजूबाजूच्या गावातील नागरिक हैराण झाले आहेत. कचरा डेपो हलवावा, या मागणीसाठी त्यांनी वारंवार पाठपुरावा केला. मात्र आश्वासनांशिवाय त्यांना काही मिळालं नाही. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन कचरा डेपो हलवावा यासाठी बेमुदत आंदोलन पुकारलं आहे. कचऱ्याच्या गाड्या टाकू दिल्या जात नसल्यानं गेल्या तीन दिवसांपासून शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग लागलेत. दवाखाने, शाळेच्या आजूबाजूचा परिसर, प्रमुख रस्ते, चौक परिसर सगळीकडे कचरा कुंड्या झाल्या आहेत. महापौर आणि आयुक्त यांच्याकडून गावकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र गावकरी निर्णयावर ठाम असल्यानं कचरा प्रश्न गंभीर होताना दिसतोय.