तुळजाभवानी मंदिरातील कोटय़वधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाटय़ावर आणणाऱ्या किशोर गंगणे यांच्याविरोधात मंदिर संस्थानतर्फे बदनामीचा खटला दाखल करण्यात आला. भाविकांनी मोठय़ा श्रद्धेने जगदंबाचरणी अर्पण केलेल्या रकमेतून १ लाख २७ हजार रुपये न्यायालयात जमा केले आहेत. मंदिरातील अनागोंदी व भ्रष्ट कारभार करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणणाऱ्या गंगणे यांच्याविरोधात तब्बल एक कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला.
तुळजाभवानी मंदिरात मागील २० वर्षांपासून भाविकांनी मोठय़ा श्रद्धेने अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तू, दागदागिने आणि रोख रकमेवर सर्रास डल्ला मारला जात आहे. गंगणे यांनी माहिती अधिकारात मिळविलेल्या कागदपत्रांतून अशी अनेक प्रकरणे चव्हाटय़ावर आली आहेत. त्यास अनुसरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार मंदिरात मागील २० वर्षांत झालेल्या अंदाजे दोन हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नवरात्रोत्सवाच्या पूर्वीच दोन महिन्यांत ही चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश सीआयडीला दिले. त्यामुळे मंदिरातील भ्रष्ट कर्मचारी, अधिकारी आणि ठेकेदारांचे धाबे दणाणून गेले. चौकशीमुळे दबाव आणण्यासाठी गंगणे यांच्याविरोधात बदनामीचा दावा ठोकला आहे, अशी चर्चा तुळजापुरात जोर धरू लागली आहे. सीआयडीमार्फत अनेक सनदी अधिकारी, मंदिर संस्थानचे सदस्य तथा आमदार, राजकीय नेते यांची सध्या चौकशी सुरू आहे. व्हीआयपी भाविकांच्या सत्कारासाठी मंदिर प्रशासन, आमदार तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त मधुकर चव्हाण यांच्या भावाच्या दुकानातून विनानिविदा साहित्याची खरेदी करीत असल्याचा आरोपही गंगणे यांनी केला होता.
सप्टेंबरअखेरीस पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांना मंदिर संस्थानच्या तहसीलदारांनी नोटीस जारी केली होती. त्यात १० कोटी रुपयांच्या बदनामीचा दावा ठोकला असल्याचे म्हटले होते. वृत्तवाहिनीवरून जाहीर माफी मागितल्यास प्रकरण मागे घेण्यात येईल, असेही नोटिशीत नमूद केले होते. गंगणे यांच्या तक्रारीवरूनच तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी मंदिरातील दानपेटय़ा ठेकेदाराच्या ताब्यातून काढून घेतल्या. परिणामी यातून मंदिर संस्थानला कोटय़वधीचा लाभ झाला.
मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेली अनागोंदी गंगणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चव्हाटय़ावर आली. मात्र, यातील दोषींवर कारवाई होण्याऐवजी मंदिराची बदनामी केल्याचा कांगावा करीत गंगणे यांच्याविरोधात उस्मानाबाद येथील जिल्हा न्यायालयात एक कोटी रुपयांच्या बदनामीचा दावा ठोकण्यात आला. यापोटी भाविकांनी अर्पण केलेल्या दानपेटीतील १ लाख २७ हजार रुपयांची रोकड न्यायालयात जमा करण्यात आली. मंदिराच्या वतीने दोन वकील बाजू मांडणार आहेत. त्यांचे शुल्कही भाविकांच्या देणगीतूनच अदा केले जाणार आहे.