पाच दिवसांत पाच वाहने जाळली, चोरीच्या घटना तर नित्याच्याच

औरंगाबादकर सध्या घराबाहेर पडल्यानंतर जाऊ तिथे लावलेले वाहन पुन्हा बघायला मिळेल की नाही, अशा भीतीखाली वावरत आहेत. दररोज वाहन चोरीच्या घटना घडत आहेतच. चोरीचा छडा लावणे अवघड असल्याची कबुली पोलीस अधिकारीच देत असल्याने गेलेली वाहने मिळण्याची आशा तक्रारदारांना वाटत नाही. हे सर्व कमी म्हणून की काय आता वाहने जाळणाऱ्यांनी अधिक धडकी भरवली आहे. शहरात मागील पाच दिवसांत कार, रिक्षा जाळण्याच्या घटना घडल्या असून घराबाहेर लावलेलीही वाहने असुरक्षित असल्याची भावना औरंगाबादकरांची झाली आहे.

औरंगपुरा भागातील जनता बाजारसमोरील पसे देऊन गाडी ठेवण्याची व्यवस्था असलेल्या वाहनतळातील चार कार माथेफिरूने जाळून टाकल्या. १४ फेब्रुवारीच्या पहाटे ही घटना घडली. विशेष म्हणजे त्या दिवशी त्याच भागात लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन या एका शाळेच्या शताब्दी महोत्सवी वर्षांच्या समारोपानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या. लोकसभा अध्यक्षांचा कार्यक्रम असलेल्या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त व तपासणी करण्यात आली होती. अशा परिस्थितीतही पसे देऊन कार लावण्याची व्यवस्था असलेल्या वाहनतळाच्या ठिकाणची सुनील जैस्वाल (रा. कुंभारवाडा), संतोष बागला (रा. रंगारगल्ली), राहुल जावळे व पटेल यांच्या कार जाळण्यात आल्या होत्या. यातील संतोष बागला यांची कार पेटवण्याची मागील तीन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. तीन महिन्यांपूर्वी कार जाळल्यानंतर घटनेच्या पंधरा दिवसांपूर्वीच घेतलेली संतोष बागला यांची कार जाळण्यात आली आहे. वाहन जाळण्याच्या या घटनेनंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, वाहतूकचे सी. डी. शेवगण, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत आदींनी भेट दिली होती. जनता बाजारसमोरील वाहनतळात कारसह इतर वाहने पाìकग करायची असतील, तर वर्षांला सहा हजार रुपये आकारले जातात. त्यानंतरही वाहन ठेवणाऱ्यांच्या कार सुरक्षित नाहीत. औरंगपुऱ्यातील या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी एक रिक्षा जाळण्यात आली. या दोन्ही घटनांना आठवडाही उलटत नाही, तोच जवाहरनगर पोलीस ठाणे हद्दीत आणखी एकाची दुचाकी जाळण्याची घटना घडली. गारखेडा परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीतील अनिल हरिभाऊ पटेकर यांची दुचाकी जाळून टाकण्यात आली आहे. या सर्व घटनांतील आरोपी नेमके कोण, याचा अद्याप सुगावा पोलिसांना लागला नाही.

चोरीच्या घटनांमध्ये वाढ

शहरातील पोलीस ठाण्यापकी चार ते पाच ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांची नोंद होताना दिसते आहे. साधारण पंधरा दिवसांपूर्वी सिडको भागातून चक्क एक जेसीबीच चोरीला गेला आहे. त्यानंतर एका घटनेत छोटा हत्ती हा टेम्पो चोरीस गेला आहे. वाहनांच्या चोरीच्या घटनांवर पोलीस शहरातील सीसीटीव्ही बंद असल्याचे कारण आणि चोरीनंतर चोरटे वाहनातील साहित्यात फेरफार करून दुसऱ्या शहरात नेऊन विकत असल्याने तपास लावणे कठीण असल्याचीही कबुलीच देताना दिसतात.