बलात्कार व खुनाच्या आरोपाखाली नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला व नागपूरच्या रुग्णालयातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात फरारी झालेला कुख्यात गुंड महेबुब पठाण यास परभणीच्या रहीमनगर येथील घरात रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. पठाण यास आज न्यायालयासमोर हजर केल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.
येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा बलात्कार करून खून केल्याच्या प्रकरणात परभणी सत्र न्यायालयात महेबुब पठाण यास फाशीची शिक्षा झाली होती. अपिलात पठाणला जन्मठेप सुनावण्यात आली. २००३मध्ये पठाणची परभणी शहरात दहशत होती. त्यास फाशी, नंतर जन्मठेप झाल्यानंतर परभणीकरांनी निश्वास टाकला. परंतु ६ ऑक्टोबरला पठाण हा नागपूर कारागृहातून फरारी झाल्याचे वृत्त वाहिन्यांमध्ये झळकताच परभणीकरांच्या काळजाचा ठोका चुकला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पीटलमधून उपचाराच्या बहाण्याने दाखल झाल्यानंतर पाणी पिण्याचे निमित्त करून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पसार झाला. त्यानंतर तो कधी ना कधी परभणीला पत्नीला भेटावयास येईल, या शक्यतेने परभणीचे पोलीस सतर्क होते. गेल्या दीड महिन्यापासून साध्या वेशात रहीमनगरमधील त्याच्या घरावर पोलीस नजर ठेवून होते. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास पठाण घरी परतल्याची माहिती १५-२० मिनिटांत नवा मोंढा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुधाकर जगताप, उपनिरीक्षक संतोष जाधवर, पोलीस कर्मचारी संजय आचार्य, राजेंद्र नंदीले, बालाजी रेड्डी, महिला पोलीस कर्मचारी राजभोज, प्रतिमा गवळी आदींनी रहीमनगरातील घरास वेढा घातला. पठाण प्रतिहल्ला करण्याच्या शक्यतेमुळे पोलीस बंदुकीसह घरात घुसले व त्यास ताब्यात घेतले. पठाण नागपूरहून फरारी झाल्यानंतर त्याच्या मागावर नागपूर, नांदेड व परभणीचे पोलीस होते. परभणी पोलिसांचे डिबी पथक व स्थानिक गुन्हे शाखा अशी वेगवेगळी पथके पठाणचा शोध घेत होती. काल रात्री पठाणला पकडण्याचा प्रयत्न करीत असताना त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. काल सायंकाळीच तो हैदराबादहून रेल्वेने परभणीत आला होता. काही दिवसांपूर्वी तो परभणीत येऊन गेल्याची माहिती पोलिसांना चौकशीदरम्यान मिळाली. नांदेड, लोहा आदी ठिकाणी त्याने या काळात वास्तव्य केले. सर्वाधिक काळ हा हैदराबाद येथे घालवल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी दुपारी महेबुब यास न्यायालयासमोर उभे करून नागपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.