भूजल सव्रेक्षण विभागातर्फे मार्चअखेर निरीक्षण विहिरींतील पाणीपातळीच्या नोंदी घेण्यात आल्या. त्यानुसार मराठवाडा विभागात मार्चअखेर झालेल्या नोंदीनुसार मागील ५ वर्षांत सरासरी भूजलपातळीत औरंगाबादेत २.४३ मीटरने घट झाली. जालन्यात १.४७ मीटर, तर परभणीत तब्बल ३.३२ मीटरने घट झाली. हिंगोलीत २.७० मीटर घट नोंदली गेली. उस्मानाबाद व बीड जिल्हय़ांतही लक्षणीय घट दिसून येते.
मागील पाच वर्षांत मार्चअखेर झालेल्या सर्वेक्षणात जिल्हय़ाची सरासरी भूजल पातळी ७.७८ मीटर होती. यंदा मार्चअखेर झालेल्या सर्वेक्षणानुसार त्यात चिंताजनक घट झाल्याचे समोर आले. नुकताच मराठवाडा विभागातील सर्व जिल्हय़ांचा अहवाल प्रसिद्ध झाला असून, त्यात नांदेड जिल्हय़ाच्या सरासरी पातळीत २ मीटरने घट झाल्याचे दर्शविले आहे.
जल पुनर्भरणाबाबत कमालीची उदासीनता, जलसंधारणाचे फसलेले प्रयोग आणि औपचारिकता म्हणून राबवलेली पाणी अडवा पाणी जिरवा योजना, दुसरीकडे भूगर्भातून निरंतर व प्रचंड होणारा पाण्याचा उपसा यामुळे भूजलस्तरात प्रचंड घट झाली. दरवर्षी त्यात भर पडत असून बोअर पाडण्याचे प्रमाण जिल्हय़ात विक्रमी झाले. परिणामी, तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दुसऱ्या बाजूने दरवर्षी उन्हाळय़ातील उष्णता असहय़ होत चालली आहे.
नांदेड जिल्हय़ातील सोळा तालुक्यांपैकी फक्त माहूरमध्ये एक मीटरपेक्षा कमी म्हणजे ०.७८ मीटर घट दिसून आली. सर्वाधिक घट मुखेड तालुक्यात ३.७६ मीटर असून येथील स्थिती चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नांदेड तालुक्यात २.८९, मुदखेड १.७९, अर्धापूर २.१७, उमरी १.२१, किनवट १.४३, हदगाव १.३३, हिमायतनगर १, भोकर २.२१ देगलूर २.५९, कंधार १.९८, बिलोली १.९६, धर्माबाद २.६३, नायगाव, २.०४ तर लोहा तालुक्यात २.२८ मीटरने घट नोंदली गेली.
जिल्हय़ात सध्या ३०८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून जलयुक्त शिवार अभियान गतीने राबवले जात आहे. जलाशयांतील गाळ काढण्यासोबतच नाले सरळीकरण व खोलीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासाठी नाम फाऊंडेशनचेही सहकार्य प्राप्त झाले आहे. येत्या पावसाळय़ात चांगला पाऊस झाल्यास जलसाठय़ात वाढीबरोबरच भूजलपातळीत भर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.