प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पीकविमा हप्ता भरण्यासाठी लागणाऱ्या पीकपेऱ्यासाठी परंडा तालुक्यातील तलाठी प्रत्येक शेतकऱ्यांकडून ५० रुपये घेऊन आíथक लूट करीत आहेत. नियमाप्रमाणे इतके शुल्क आकारता येत नसतानाही उघडउघड तलाठी प्रत्येक शेतकऱ्याकडून लाच घेत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. तर दुसरीकडे यंदा प्रथमच पीकविम्यासाठी अनेक कागदपत्रे लागत असल्याने शेतकऱ्यांची कागदपत्रे जुळवाजुळवीसाठी धडपड सुरू आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजना यंदापासून सुरू करण्यात आली आहे. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधारकार्ड, मतदानकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत, अध्यक्ष अथवा गटसचिव, बँकेच्या अधिकाऱ्याची आणि शेतकऱ्यांची स्वाक्षरी बंधनकारक असल्याने पीकविमा भरण्यासाठी कागदांची जुळवाजुळव करण्यात शेतकऱ्यांचा अधिक वेळ जात आहे. पीकविमा भरण्याची अंतिम मुदत ३१ जुल असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परंडा शाखेत शेतकऱ्यांची पीकविम्याचा हप्ता भरण्यासाठी झुंबड उडाली आहे.

तालुक्यात मागील तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण घटले आहे. यंदा जून महिन्यातच पावसाने चांगली सुरुवात केली आहे. त्यामुळे तालुक्यात एकूण खरीप क्षेत्राच्या दीडपट अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्या खरिपाचे पीक चांगल्या स्थितीत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने पीकविमाही अधिक मिळाला होता. प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत नुकसानभरपाई अधिक असल्याने यंदा शेतकरी पीकविमा भरण्यास उत्सुक आहेत. पीकविमा भरण्यासाठी तलाठय़ाचे पीकपेरा प्रमाणपत्र आवश्यक असल्याने तलाठय़ाकडे शेतकरी गर्दी करीत आहेत. गर्दीचा फायदा घेत तलाठी पीकपेरा प्रमाणपत्र देण्यासाठी ४० ते ५० रुपये घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून केला जात आहे. शेतकऱ्यांची ही लूट थांबविण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणीही शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

कागदपत्रे आवश्यकच!

प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची आधार लिंक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे बँकेत जमा करणे गरजेचे आहे. या कागदपत्रांमुळे दुसऱ्या व्यक्तीचा पीकविमा भरता येत नाही. त्यामुळे या योजनेत पारदर्शकता असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन बँक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.