मराठवाडय़ात ३४० कोटींची तूट; दुचाकी वाहन विक्रीवरही परिणाम

औरंगाबाद विभागातून १६ टक्के विक्रीकर अधिक मिळेल असे सरकारने गृहीत धरले होते व किमान २८९० कोटी रुपये मिळतील असा अंदाज होता. मात्र, नोटाबंदी आणि परिणामी कमी झालेली उलाढाल यामुळे अपेक्षित विक्रीकर उत्पन्नात ३४० कोटी ६६ लाख रुपयांची घट झाली आहे.

नोटाबंदीमुळे दुचाकी वाहन विक्रीवर मोठा परिणाम दिसून आला. औरंगाबादमध्ये बजाज कंपनीच्या दुचाकी गाडय़ा बनतात. त्यांच्याकडून अपेक्षित विक्रीकरामध्ये ८५ कोटी रुपये घटले. तसेच चारचाकीच्या गाडय़ांमध्ये नावाजलेल्या स्कोडा कंपनीकडूनही अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेमध्ये ३३ कोटी रुपये कमी मिळाले. औरंगाबाद विभागातून ऑटोमोबाइल्स, मद्य, प्लास्टिक, साखर, अभियांत्रिकीचे साहित्य, कागद, कंत्राटदारांकडील कामे, घरगुती उत्पादने या सर्व क्षेत्रांत कमी विक्रीकर मिळाल्याची आकडेवारी आहे. चांगले पाऊसमान असतानाच्या मालाची विक्री न झाल्याने उद्दिष्ट गाठता आले नसल्याचे दिसून येत आहे.

खरे तर मराठवाडय़ातून मिळणाऱ्या विक्रीकरामध्ये वाढ होईल, असे अपेक्षित होते. मात्र, नोटाबंदीनंतर बाजार थंडावला तो काही पूर्वपदावर आलाच नाही, असे सांगणारी मार्चअखेरीची आकडेवारी उलाढाल कशी घटली हे सांगणारी आहे. औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्हय़ांतून नेहमी अधिक विक्रीकर मिळतो. या वर्षीही तो ५० कोटींनी वाढला आहे. मात्र, अपेक्षित उद्दिष्ट गाठता आले नाही. या वर्षी २५५० कोटी १० लाख रुपयेच विक्रीकरातून मिळाले. यात सर्वाधिक हिस्सा औरंगाबादचा असून जिल्हय़ातून २ हजार २२७ कोटी रुपये विक्रीकर मिळाला. गेल्या वर्षी तो २ हजार २१३ कोटी एवढा होता. औरंगाबाद विभागात ३५ हजार २६४ डीलर आहेत. मात्र, या वर्षी विविध क्षेत्रांत विक्री न झाल्याने उलाढाल घटली. विशेषत: बजाजच्या वेंडरकडून ९० लाख एवढा विक्री कर कमी आला. ऑटो क्षेत्रातील घसरण आणि मद्यविक्रीतील घट यामुळेही विक्रीकराचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये मार्च २०१६ मध्ये ८१५ कोटी १५ लाख रुपयांचा विक्रीकर मिळाला होता. या वर्षी हा आकडा ७५२ कोटी ८४ लाखांवरच स्थिरावला. ६२ कोटी ३१ लाखांची ही घसरण उणे चिन्हात दर्शविणे विक्रीकर विभागालाही भाग पडले. मद्यविक्रीवरील नव्या बंधनामुळे तसेच गेल्या वर्षी पाणीकपात केल्यामुळे उत्पादनात घट झाली. त्याचबरोबर विक्रीही घसरणीलाच होती. गेल्या वर्षी ५०३ कोटी ६६ लाख मद्य क्षेत्राचा विक्रीकर होता. तो या वर्षी ४९४ कोटी ९८ लाखांवर स्थिरावला. दुष्काळामुळे साखर क्षेत्रातून मिळणारा विक्रीकर कमी होईल, असे पूर्वीपासून मानले जात होते. त्यात १ कोटी ८३ लाख रुपयांची घसरण दिसून आली. नोटाबंदीनंतर बांधकाम क्षेत्राला मंदी आली. परिणामी कंत्राटदारांकडील काम कमी झाले. या क्षेत्रातून मिळणाऱ्या विक्रीकरात ६३ लाख रुपयांची घसरण आहे, हे विशेष.

कॅशलेसचा परिणाम

या वर्षांत जमा झालेल्या २५५० कोटी रुपयांपैकी २४१४ कोटी रुपये ई-पेमेंटद्वारे पोचले. १३६ कोटी रुपये रोख स्वरूपात भरले गेले. उत्पन्न स्रोताली कर कपात आणि कर संकलन यात मात्र चांगली वाढ दिसून आली आहे. औरंगाबादमध्ये २१ कोटी १ लाख, जालन्यात ५ कोटी ४४ लाख आणि बीडमध्ये २ कोटी ९३ लाख अशी कर कपात आणि कर संकलन झाले आहे.

कार्ल्सबर्ग, बिडवे इंजिनीअरिंग, एटीएस मोटार, ऋचा इंजिनीअरिंग प्रा. लि., कॅनपॅक इंडिया, रत्नप्रभा मोटार्स, इंडर्स हाऊजर्स, बाफना मोटार्स, गीताई स्टील, अभय कोटॅक्स हे करदाते विक्रीकर विभागाच्या लेखी ‘सकारात्मक’ प्रतिसादाचे असल्याची माहिती यात आहे. यात ऋचा, रत्नप्रभा आणि कार्ल्सबर्ग बीअर उत्पादक कंपनीच्या विक्रीत वाढ झाल्याची आकडेवारी आहे.

विविध क्षेत्रांत विक्रीमध्ये घट झाल्याचे दिसून आले. त्याची वेगवेगळी कारणे आहेत. गेल्या वर्षीपेक्षा ५० कोटी रुपये विक्रीकरातून अधिक मिळाले आहेत. मात्र, १६ टक्के वाढ गृहीत धरून ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, टीडीएस व टीसीएसमध्ये वाढ झाली आहे.’ डी. एम. मुगळीकर, विक्रीकर सहआयुक्त

1

2