रेशनच्या दुकानावर १२० तर मॉलमध्ये ९५ रुपयांचा दर!

बृहन्मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या चार शहरांत जर तुम्ही राहत असाल आणि ठरवून दिलेल्या मॉलमध्ये जर तूरडाळ घेतली तर तिचा दर ९५ रुपये असेल आणि जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि रेशनच्या दुकानात जाल तर तुम्हाला तूरडाळ मिळेल १२० रुपये किलो या दराने. डाळ महागल्याने दर नियंत्रित करताना राज्य शासनाने शहरी आणि ग्रामीण अशा दरांमध्ये भेदभाव केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

डाळीचे भाव नियंत्रित करण्यासाठी या चार जिल्ह्य़ांमध्ये ठरावीक ठिकाणी डाळ विक्रीचे केंद्र नव्यानेच सुरू करण्याचे निर्देश ८ जुलै रोजी देण्यात आले होते. त्यानुसार औरंगाबाद शहरात किराणा र्मचट असोसिएशन, स्टार बाजार, सपना र्मचट असोसिएशन, डी मार्ट, बेस्ट प्राइझ आणि मोअर या ठिकाणी स्वस्त तूरडाळ विक्रीची ठिकाणे ठरविण्यात आली. औरंगाबादप्रमाणे अन्य शहरांतही सर्वसाधारणपणे मॉलची निवड जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांनी करून दिली. या केंद्रांवर तूरडाळ विक्रीची कार्यपद्धत ठरवून देणारा शासन निर्णय २८ जुलै रोजी काढण्यात आला. महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन यांच्यामार्फत डाळ उपलब्ध करून दिल्यानंतर जिल्हास्तरावर मागणी करणाऱ्या संस्थेने ९५ रुपयांमध्ये प्रतिकिलो प्रतिव्यक्ती एक वेळा डाळ उपलब्ध करून द्यावी, असे आदेश देण्यात आले. शहरी भागातील दिली जाणारी डाळ केंद्र शासनाने खरेदी केलेली आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत अंत्योदय, दारिद्रय़रेषेखालील व इतर सर्व शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्यांसाठी कमाल १२० रुपये प्रतिकिलो दराने डाळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. २१ जुलैच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागात रेशनच्या दुकानावर जाणाऱ्या तुलनेने गरीब माणसाला १२० रुपये किलोने डाळ विक्री होईल. डाळ विक्रीच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या वेगवेगळ्या तीन शासन निर्णयाचा अर्थ राजकीय अंगाने तपासला जात आहे. भाजपचा तोंडवळा शहरी असल्याची टीका सातत्याने होत असते. त्याला बळ देणारा शासन निर्णय झाला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.