भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या वेगवेगळ्या जिल्ह्य़ांच्या दौऱ्यांचे कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्याची नवी पद्धत रुढ झाली असेल तर राज्यातील इतर पक्षांच्या अध्यक्षांचे दौरे प्रशासनाकडून सर्व संबंधितांना कळवावेत, अशी मागणी काँग्रेस पक्षाने येथे केली.
शिवसेना पक्षप्रमुख रविवारी नांदेडच्या दौऱ्यावर आले होते. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्या या दौऱ्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना ज्या पत्राद्वारे कळविली होती, त्या पत्राच्या प्रती सर्व संबंधित विभागांना पाठवताना जिल्ह्य़ातील सर्व खासदार, आमदार, महापौर आदींना पाठविल्यामुळे नवा वाद निर्माण झाला.
शेजारच्या हिंगोली जिल्ह्य़ात भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम प्रशासनाने लोकप्रतिनिधींना पाठविला होता. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचे आमदार डी. पी. सावंत व अमरनाथ राजूरकर यांनी जिल्हा प्रशासनाच्या या कृतीवर आक्षेप घेतला. केवळ सत्ताधारी पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांच्या बाबतीत असा शिष्टाचार पाळण्याऐवजी इतर पक्षांचे प्रमुख किंवा प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यांचे कार्यक्रम जारी करून सर्वाना कळवून त्यांचाही मान राखा, अशी मागणी काँग्रेसच्या या दोन्ही आमदारांनी केली.
ठाकरे यांच्या नांदेड ते औरंगाबादपर्यंतच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आपल्या स्वाक्षरीनिशी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना २८ नोव्हेंबर रोजी पाठविला होता. हा प्रकारही चमत्कारिक असून रावते हे मंत्री आहेत की, राजशिष्टाचार अधिकारी, असा सवाल सावंत यांनी केला. रावते यांनी सरकारी लेटरहेडवरून जारी केलेल्या ठाकरे यांच्या दौरा कार्यक्रमाची प्रत सर्वपक्षीय आमदार-खासदारांना जिल्हाधिकारी कार्यालयाने कशासाठी पाठविली, असा आक्षेप सावंत यांनी घेतला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी वरील प्रकारावर थेट प्रतिक्रिया दिली नाही; पण सखेद आश्चर्य व्यक्त केले.
पक्षप्रमुखांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री रावते शनिवारी दुपारी नांदेडला आले. नंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रब्बी हंगामाची आढावा बैठक घेताना विरोधी पक्षांच्या आमदारांना बोलावले नाही. या बैठकीत केवळ शिवसेनेच्या आमदारांना बोलाविण्यात आले. पालकमंत्र्यांनी खासदार चव्हाण यांच्यासह जिल्ह्य़ातील इतर लोकप्रतिनिधींचा अवमान केला आहे, असे आमदार सावंत यांनी नमूद केले. या अनिष्ट प्रकाराबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.