परळीत धनंजय, बीडमध्ये संदीप यांनी सद्दी संपवली

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या चार दशकांच्या संघर्षांतून परळी मतदारसंघात निर्माण केलेल्या राजकीय साम्राज्याला पुतणे धनंजय मुंडे यांनी सुरुंग लावत नगरपालिकेपाठोपाठ पंचायत समिती व जिल्हा परिषदेची सत्ता मिळवली. बहीण ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावूनही घरचे मदान राखण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. बीड मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या तीन दशकांच्या प्रभावाला पुतणे संदीप क्षीरसागर यांनी नगरपालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेतही सुरुंग लावत स्वत:चे वर्चस्व निर्माण केले. काकाला केवळ एक जागा मिळवता आली. त्यामुळे दिग्गज काकांनी संघर्षांतून उभा केलेल्या राजकीय संस्थांनावर पुतण्यांचे वर्चस्व दिसून येत आहे.

बीड जिल्ह्यात घराणेशाहीच्या राजकारणाला महत्त्व असले तरी घरात वाद निर्माण होऊन एकमेकांविरुद्ध उभे राहण्याची प्रथाच पडली आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना पुतणे धनंजय मुंडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासूनच आव्हान दिले. बारामतीकरांनी राजकीय रसद पुरविल्याने प्रत्येक निवडणुकीत धनंजय यांनी काकांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले.

मात्र प्रत्येक वेळी गोपीनाथ मुंडे यांनी आपला प्रभाव कायम ठेवला. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर काका-पुतण्याच्या वर्चस्वाची लढाई भाऊ-बहिणीत स्थिरावल्यानंतर दोघांच्याही नेतृत्वाचा कस लागला. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विजयाचा दावा करत नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेऊन जनमत मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदारांनी भाजपला नाकारत परळी नगरपालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत दिले. परळी मतदारसंघातील गट आणि गणांची निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची करूनही भाजपला दारुण पराभव पत्कारावा लागला. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर पंकजा मुंडेंचे असलेले वर्चस्व खालसा करून त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा झेंडा रोवण्यात धनंजय मुंडे यशस्वी ठरले.

काका गोपीनाथ मुंडे यांनी मोठय़ा संघर्षांतून राजकीय साम्राज्याची निर्मिती केल्याने परळी मतदारसंघ मुंडेंचा बालेकिल्ला मानला जाई. विपरीत राजकीय परिस्थितीतही मुंडेंनी मतदारसंघावरील पकड मजबूत ठेवली होती. मतदारसंघ ताब्यात असेल तरच राज्यात मान असतो, ही धारणा त्यांची होती.

मात्र त्यांनी निर्माण केलेल्या साम्राज्याला पुतणे धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुरुंग लावल्याने मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मतदारसंघ आता राजकीयदृष्टय़ा अडचणीचा होऊ लागला आहे.