सेवाभावी संस्थेने बांधलेल्या बंधाऱ्याच्या लोकार्पणासाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी थेट बलगाडीतून अर्धा किलोमीटर तर काही अंतर चिखल तुडवत जाऊन सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढवला. परतीचा प्रवास एका टॅक्टरमधून करत लोकसहभागातून डॉ. शिवप्रसाद चरखा यांच्या नेतृत्वाखाली ३२ किलोमीटर नद्यांचे खोलीकरणाचे काम पाहून नवलकिशोर राम यांनी या नदीपात्रात वीस बंधारे मंजूर करण्याची घोषणाही केली.

बीड तालुक्यातील पपळनेर परिसरात डॉ. शिवप्रसाद चरखा यांच्या सिद्धिविनायक सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या वर्षी दुष्काळात पपळनेर परिसरातील मन्यारवाडी, अंबेसावळी, बेलवाडी, मानकुरवाडी, बेडूकवाडी, लोणी, शहाजनपूर, सांडरवन, केसापुरी परभणी, ताडसोन्ना या गावातील नद्यांचे खोलीकरणाचे व रुंदीकरणाचे काम नाम फाउडेशन, आरती इंडस्ट्रीज, समस्त महाजन, आर्ट ऑफ लिव्हिंग, केमिकल अल्कली असोसिएशन यांच्या मदतीने ३२ किलोमीटरचे काम केले आहे. तर सिद्धिविनायक संस्थेने या परिसरात तीन बंधारे लोकसहभागातून उभे केले. थोडय़ाशा पावसात या बंधाऱ्यांमध्ये पाणी साचले. त्यामुळे हा बंधारा लोकार्पण करण्यासाठी रविवारी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम या परिसरात पोहोचले. पिंपळनेरपासून डोंगराळ भागात असलेल्या बंधाऱ्याकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने आणि थोडय़ाशा पावसाने झालेला चिखल तुडवत जिल्हाधिकारी थेट बंधाऱ्याकडे निघाले. काही अंतरावर एका शेतकऱ्याच्या बलगाडीत बसून त्यांनी अर्धा किलोमीटर अंतर पार केले. त्यानंतर बंधाऱ्याच्या ठिकाणी जाऊन जलपूजन केले आणि परत टॅक्टरमधून मुख्य रस्त्याकडे आले. सिद्धिविनायक संस्थेचे या परिसरातील काम अत्यंत कौतुकास्पद आहे, असे सांगून विविध संस्थांनी केलेल्या नद्यांच्या खोलीकरणामुळे या परिसरातील सिंचन वाढण्यास पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता वीस बंधारे या परिसरात देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. सेवाभावी संस्थेचे काम पाहण्यासाठी जिल्हाधिकारी थेट बलगाडीतून चिखल तुडवत बंधाऱ्यावर आल्यामुळे सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संस्थांचे पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. या वेळी संस्थेचे हितेश मेहता, भरत शहा, जयंत तोलिया, लघुसिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.