औरंगाबाद-जळगांव रस्त्याचे दुरुस्तीचे काम डिसेंबरअखेर सुरू केले जाणार आहे. तसेच औरंगाबाद-पठण रस्त्याचे दुरुस्तीचे काम तत्काळ सुरूकरण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी दिल्या.
रस्ते खड्डेमुक्त करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी हाती घेतला. खड्डे कसे बुजवायचे, याचे प्रशिक्षणही बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आले. खड्डे बुजवताना कंत्राटदार कसे थातूर-मातूर काम करतात आणि देयके उचलतात, ही सर्वश्रुत माहिती यापुढे चालणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले होते. राज्य रस्ते दुरुस्तीचा हा कार्यक्रम करताना कंत्राटदाराला पाच वर्षांपर्यंत देखभालीचा ठेका देण्यात आला आहे.  औरंगाबाद-जळगाव व औरंगाबाद-पैठण हे दोन्ही रस्ते खराब झाले आहेत. तुलनेने पैठण रस्त्याची तर अक्षरश: चाळण झाली आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी फर्दापूर येथील शासकीय विश्रामगृहात बठक घेऊन खड्डेमुक्तीच्या उपक्रमाचा आढावा घेतला. या वेळी आमदार अब्दुल सत्तार, मुख्य अभियंता हेमंत पगारे, औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे, अशोक ससाणे, राष्ट्रीय महामार्ग मंडळाचे  बोडके आदींची उपस्थित होते.
मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर व राज्यातील इतर जिल्हयातील रस्त्यांची पाहणी करण्यात येणार असून ३१ जानेवारी २०१६ पर्यंत राज्यातील संपूर्ण रस्ते खड्डेमुक्त केले जाईल व यासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.