जिल्हय़ातील भूजलपातळीत झालेली घट, तसेच स्रोत कमी झाल्यामुळे पाणीसाठा मर्यादित आहे. त्याचा योग्य वापर जुलअखेपर्यंत करता येईल याचे नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

जिल्हय़ातील पाणीटंचाई, दुष्काळी स्थिती, रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार आदींबाबत पालकमंत्री मुंडे यांनी शासकीय विश्रामगृहात आढावा बठक घेतली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हय़ात सध्या ३४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाने उशीर केल्यास तत्काळ अन्य उपाययोजना कराव्या लागतील. पाण्याचे स्रोत शोधून पाणी उपलब्ध करून संबंधित भागाला पुरवले पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले. नागरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही िवधनविहिरींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अमर्याद पाणी उपशावर नियंत्रण असले पाहिजे. त्या दृष्टीने िवधनविहीर अधिनियमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

सध्या मिरजेहून लातूरला रेल्वेने पाणी आणण्यात येत आहे, त्याची माहिती त्यांनी घेतली. निम्न तेरणा व तावरजा प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यात यश येत आहे. कायमस्वरूपी दीर्घकालीन उपाययोजनांबाबतही प्रशासनाने मार्ग शोधण्याचे आवाहन त्यांनी केले. या वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जलपुनर्भरणाची चळवळ सुरू झाली आहे. जलसंधारणाची कामेही मोठय़ा प्रमाणात झाली आहेत. या कामामुळे नव्याने किती पाणीसाठा उपलब्ध होणार आहे, किती शेती सिंचनाखाली येईल, याचा अंदाजित आराखडा तयार करावा. ज्यामुळे भविष्यात नियोजन करणे सोयीचे होईल असे त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसानिमित्त वन विभागाच्या वतीने केलेल्या नियोजनाची माहिती त्यांनी घेतली. येत्या ३ जूनपासून जुलपर्यंत ४० लाख झाडे लावण्याचे नियोजन केल्याचे जिल्हाधिकारी पोले यांनी सांगितले. या वर्षी नव्याने १७६ गावांत जलयुक्त अभियानाची कामे सुरू करण्यात येत आहेत. मागील वर्षांची कामे पूर्ण करण्यास गती देण्याची सूचना त्यांनी दिली. ग्रामीण भागात शोषखड्डे घेण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत मोहीम राबवली जात आहे. यातून डासमुक्त गाव निर्माण होईल. गावाचे आरोग्य सुधारेल व स्वच्छताही राहील. यासंदर्भात अधिकाधिक काम व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसाचे औचित्य साधून मुंडे यांच्या हस्ते वन्य प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या व त्यांचा जीव वाचवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महेबूब शेख यांचा सत्कार करण्यात आला.