मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या १० जून २००७ रोजी गठीत केलेल्या कार्यकारिणीची व पदाधिकाऱ्यांची निवड व त्याबाबतचा बदल अर्ज धर्मादाय आयुक्तांनी मंजूर केल्यानंतर त्या विरोधात माजी सरचिटणीस मधुकर मुळे व इतरांनी आक्षेप घेत त्या आदेशास स्थगिती मागितली होती. जिल्हा न्यायालयाने त्यांचा स्थगिती अर्ज फेटाळला. जिल्हा न्या. जे. एन. राजे यांनी हा निर्णय दिला.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक १० जून रोजी होऊन १०२ सभासदांनी पदाधिकाऱ्यांची निवड केली. त्याबाबतचा बदल अर्ज औरंगाबादच्या उपधर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात सादर केला होता. तो १६ जून २०१५ रोजी फेटाळण्यात आला. त्या विरोधात संचालक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोळंके व सरचिटणीस सतीश चव्हाण यांनी मुंबई धर्मादाय आयुक्तांकडे अपील केले होते. मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांनी औरंगाबादच्या उपधर्मादाय आयुक्तांचे आदेश रद्द करून बदल अर्ज मंजूर केला होता. त्यास स्थगिती मिळावी, अशी मागणी मधुकरराव मुळे यांनी जिल्हा न्यायालयात केली होती. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अॅड. दिलीप चौधरी यांनी काम पाहिले.