अंबाजोगाईचे सहा अधिकारी-कर्मचारी निलंबित

बीड जिल्हय़ातील अंबाजोगाई तालुक्यात रोजगार हमीच्या ३७६ कामांमध्ये ५८ कोटी ८७ लाख रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या ६ अधिकारी-कर्मचाऱ्यांना विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी मंगळवारी निलंबित केले. तत्कालीन तहसीलदार आर. एम. पाटील, जि. प. बांधकाम विभागाचे उपअभियंता बी. के. सरक, शाखा अभियंता एस. एस. चव्हाण, सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी आय. एस. केंद्रे, सहायक लागवड अधिकारी एस. आर. मगर तसेच अंबाजोगाई तहसील कार्यालयातील अव्वल कारकून एस. बी. गायकवाड यांना निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले.

अंबाजोगाई तालुक्यात २५ लाख ६९ हजार ८४७ रुपयांची वित्तीय अनियमितता, तसेच ५१ लाख ६७ हजार ४९६ रुपये अतिरिक्त देण्याचा घाट या अधिकाऱ्यांनी संगनमताने घातला होता. मातीनाला बांध, नाला सरलीकरण, फळबाग लागवड व सलग समतल चर या कामात ५१ लाख ६७ हजार ४९६ रुपये अधिकचे देण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले होते.

रोहयोचे उपायुक्त, कृषी अधीक्षक, रोहयोचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता व लेखा अधिकारी यांच्या समितीने २७ ऑक्टोबर ते २३ जानेवारी दरम्यानच्या कामांची तांत्रिक, प्रशासकीय व लेखाविषयक तपासणी केली.

तपासलेल्या २१ कामांपैकी १३ कामे असमाधानकारक दिसून आली. या अधिकाऱ्यांनी नाना प्रकारचे घोटाळे केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला. वर्षभरात केलेल्या कामांची प्रत्यक्षात तपासणी केल्यानंतर अनेक घोळ यंत्रणेसमोर आले. त्यामुळे सहा जणांना निलंबित करण्यात आले.

३७६ कामांच्या यादीपैकी ३०४ गावांनी रोहयो कामाबाबत ठराव केला नव्हता. ३३२ कामे वार्षिक आराखडय़ातच मंजूर नव्हती. पाचपेक्षा अधिक कामांना मंजुरी देताना जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता आवश्यक असते, ती घेतली गेली नाही. केलेल्या कामाचे मोजमाप नोंदवण्याच्या वहीत पाने कोरी ठेवली गेली.

एका कामासाठी ३ ते १० मोजमाप नोंदवहय़ा वापरल्या गेल्या. बहुतांश कामे जि.प. बांधकाम विभागामार्फत घेण्याकडे अधिकाऱ्यांचा कल होता. हा सगळा घोटाळा उघडकीस आल्यानंतर ६ अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.