23 September 2017

News Flash

साई संस्थेचे पदाधिकारी, परीक्षा विभाग यांची ‘आर्थिक अभियांत्रिकी’?

औरंगाबादमधील कॉपी प्रकरण

बिपिन देशपांडे, औरंगाबाद | Updated: May 19, 2017 2:06 AM

औरंगाबादजवळील चौका परिसरातील श्री साई इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील २४ विद्यार्थी, ३ विद्यार्थिनींना शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या सुरेवाडी येथील निवासस्थानी स्थापत्य शाखेचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड ड्राफ्टिंग हा पेपर सोडवताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री छापा मारून पकडले.

औरंगाबादमधील कॉपी प्रकरण; परीक्षा केंद्र दिले नसतानाही पैसा कमावण्यासाठी साईच्या पदाधिकाऱ्यांचा उद्योग

शिवसेना नगरसेवकाच्या घरातच श्री साई इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी स्थापत्य शाखेचा पेपर सोडवताना मंगळवारी मध्यरात्री आढळून आल्यानंतर या प्रकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या यंत्रणेकडेच बोट दाखविले जात आहे. परीक्षेचे केंद्र द्यायचे नाही, असे ठरलेले असतानाही ते देण्यात आले. त्यामागे या साई अभियांत्रिकीतील पदाधिकाऱ्यांनी पद्धतशीर विद्यापीठाची यंत्रणा हाताशी धरली असून कुलगुरूंचे मन वळवण्यासह विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी जागा उपलब्ध करून देत पैसा कमावण्याचा व्यवसाय बनवल्याचे स्पष्ट होत आहे. यातून विद्यापीठाचीच प्रतिमा मलीन झाली आहे.

औरंगाबादजवळील चौका परिसरातील श्री साई इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील २४ विद्यार्थी, ३ विद्यार्थिनींना शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या सुरेवाडी येथील निवासस्थानी स्थापत्य शाखेचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड ड्राफ्टिंग हा पेपर सोडवताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री छापा मारून पकडले. छाप्यात शिवसेना नगरसेवक सुरे यांच्यासह त्यांचा मुलगा व अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलेला किरण सुरे याचीही चौकशी केली. त्यानंतर संस्थाचालक अ‍ॅड. गंगाधर नाथराव मुंडे, त्याचा भाऊ मंगेश मुंडे, प्राचार्य डॉ. संतोष देशमुख, केंद्रप्रमुख अमित माणिक कांबळे, प्रा. विजय केशवराव आंधळे यांना ताब्यात घेतले. या सर्वाची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद या चार जिल्ह्य़ातील ३०० किलोमीटरवरील उत्तरपत्रिका आणण्यासाठी विद्यापीठाकडे दोनच वाहने आहेत. त्यामुळे दररोज पेपर आणणे विद्यापीठ प्रशासनाला शक्य नसल्यानेच दोन-दोन दिवस उत्तरपत्रिका संबंधित महाविद्यालयात ठेवण्याची मुभा देण्यात आली होती आणि त्यातूनच फेरलिखाणाचा मार्ग अनेक महाविद्यालयांना सापडला आहे. साई अभियांत्रिकी महाविद्यालय पकडला तो चोर, या प्रकारातले आहे. जेव्हा विद्यार्थ्यांना पकडले त्यानंतर तातडीने विद्यापीठाकडून साई अभियांत्रिकी महाविद्यालयास भेट देण्यात आली व परीक्षा केंद्र रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले गेले.

परीक्षेचा सगळा घोळ

परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका त्याच दिवशी विद्यापीठामध्ये याव्यात असे अपेक्षित आहे. घडते भलतेच. दोन-तीन दिवस उत्तरपत्रिका केंद्रामध्येच ठेवल्या जातात. त्याची जबाबदारी प्रार्चायांवर असते. मात्र, संस्थाचालक आणि प्रचार्य यांच्या संगनमतातून लिहिलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा लिहिण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात, याचा अंदाजच प्रशासनाला आला नाही. दरवर्षी अभियांत्रिकीच्या परीक्षांचा एक तरी घोळ विद्यापीठ प्रशासनाकडून घातला जातोच. जेथे उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन होते, तेथे सहजपणे जाता येते आणि उत्तरपत्रिका कोणालाही तपासता येऊ शकतात, हे उदाहरणही औरंगाबादमध्ये घडून गेले आहे. ज्या संस्थेमध्ये हा धंदा सुरू होता त्या महाविद्यालयात वीजही उपलब्ध नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. पात्र उमेदार नसतानाही अभियांत्रिकी महाविद्यालये त्यांचा कारभार हाकतात. संलग्नीकरणाच्या वेळी आवश्यक त्या सोयी आहेत काय, याची चाचपणी करता महाविद्यालयांना मान्यता दिल्या जातात. त्याचे परिणाम म्हणून असे प्रकार घडतात, असा आरोप करण्यात आला आहे.

प्रति पेपर पाच ते दहा हजार

पोलिसांच्या तपासात प्रा. विजय आंधळे हाच सर्व पेपरचे व विद्यार्थ्यांकडून प्रति पेपर ५ ते १० हजार रुपये घ्यायचा, अशी माहिती समोर आली. प्रवेश घेतेवेळीच काही जुन्या विद्यार्थ्यांकडून नवीन मुलांना परीक्षेत पास व्हायचा कानमंत्र आंधळे द्यायचा. त्यातून गेल्या काही वर्षांपासून साई अभियांत्रिकी महाविद्यालयात पैसे घेऊन विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी कॉपी करू देण्यासाठी पाठबळ दिले जायचे. या महाविद्यालयात प्रवेश म्हणजे आपल्यातील अभियंत्यावर शिक्कामोर्तबच आहे, असेच विद्यार्थ्यांवर बिंबवले जात होते. त्यामुळे अभियांत्रिकीचा प्रवास विद्यार्थ्यांना सोपा वाटायचा. पोलिसांच्या तपासात याच प्रा. विजय आंधळे याच्या घरात आणखीही काही विषयांच्या उत्तरपत्रिका सापडल्या आहेत. प्रा. आंधळे याच्याकडे उत्तरपत्रिका घरी ठेवून घ्यायची एवढी हिंमत कशी आली, हा प्रश्न उपस्थित होत असून त्यामागे विद्यापीठातील परीक्षा विभागाची यंत्रणा हाताशी असल्याचेच स्पष्ट होत आहे. परीक्षा विभागातील नेटक्या नियोजनामुळे यावर्षी साई अभियांत्रिकीला परीक्षा केंद्र म्हणून मान्यता बहाल करण्यात आली. खरे तर कुलगुरूंनी साई अभियांत्रिकीला केंद्र मंजूर करण्यास विरोध केला होता. मात्र त्यांचे मन वळवण्यात आले व दोनच दिवसात कुलगुरूंना त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला.

 

First Published on May 19, 2017 2:06 am

Web Title: engineering examination 2017 copy case at aurangabad
 1. M
  mahesh
  May 19, 2017 at 2:59 pm
  पोलिसांच्या तपासात याच प्रा. विजय आंधळे याच्या घरात आणखीही काही विषयांच्या उत्तरपत्रिका सापडल्या आहेत. प्रा. आंधळे याच्याकडे उत्तरपत्रिका घरी ठेवून घ्यायची एवढी हिंमत कशी आली, हा प्रश्न उपस्थित होत असून त्यामागे विद्यापीठातील परीक्षा विभागाची यंत्रणा हाताशी असल्याचेच स्पष्ट होत आहे. आंधळे दळतोय विद्या कुत्रा खातोय पीठ अधिकारी शंभर टक्के सुटतील
  Reply
  1. A
   Anil Gudhekar
   May 19, 2017 at 7:58 am
   aani nokari detaanaa practickes ghenyat yetaat .......tyat te fail hotaat ..v ase javal javal 80 enginerrs bekar aahet ....ni mag dosh sarakarala dyavayacha
   Reply