नोटा छापणाऱ्यास ३० मेपर्यंत पोलीस कोठडी

नवीन दोन हजार, पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छापून त्या बाजारात चलनात आणलेल्या असल्याने त्याचा शोध घेण्याचे आव्हान गुन्हे शाखेच्या पोलिसांसमोर आहे. दरम्यान याप्रकरणात पकडलेला आरोपी माजीद खान बिस्मिल्ला खान (वय ४२, रा. इंदिरानगर) याला ३० मेपर्यंतची पोलीस कोठडी मिळाली आहे.

बायजीपुरा भागात माजीद खान हा एका घरात नवीन दोन हजार, पाचशेच्या तंतोतंत खऱ्या वाटणाऱ्या नोटा तयार करायचा. पाचशेच्या नोटेतील हिरव्या रंगाची पट्टी, चमकीही त्याच्या नोटेत दिसायची. खरी नोट व माजीद खानकडील खोटी नोट यामधील फरक तत्काळ लक्षात येणारा नाही. अशा बनावट नोटा तयार केल्या जात असल्याची माहिती पोलिसांना गुरुवारीच मिळाली होती. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीची खातरजमा केली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी माजीद खान याला ५ लाख ५ हजार ३०० रुपयांच्या दोन हजार, पाचशे व शंभरच्या नोटांसह पकडण्यात आले. त्याच्याकडील छापखान्यातील प्रिंटरसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. शुक्रवारी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी माजीद खानच्या बनावट नोटांचे प्रकरण पत्रकारांना सांगितले. त्यानंतर शनिवारी माजीद खान याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ३० मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

माजीद खान हा खऱ्या नोटांच्या बदल्यात दुप्पट बनावट नोटा देण्याचेही काम करायचा. त्या बनावट नोटा त्याने अनेकांच्या माध्यमातून चलनात आणल्या आहेत. या सर्व नोटांचा शोध घेण्याचे आव्हान गुन्हे शाखेच्या पोलिसांपुढे राहणार आहे.

दोन महिन्यांपूर्वीही शहरातील शहागंज परिसरात एक तरुण बनावट नोट चलनात आणताना आढळून आला होता. पोलिसांनी ही घटना उघडकीस आणल्यानंतर नारेगाव परिसरातून आणखी एकाला अटक करण्यात आली होती. दोन्ही आरोपींनी अंबड येथून व हिंगोली जिल्ह्य़ातून काही नोटा आणल्याची कबुली दिली होती. पोलिसांचे एक पथक दोन वेळा हिंगोली, वसमत या भागात जाऊन आले. मात्र, त्या वेळी मास्टर माईंड व्यक्ती पोलिसांच्या हाती लागली नाही. या घटनेला आता दोन महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप त्याप्रकरणातील बनावट नोटांचा सूत्रधार हाती लागला नाही.