हमीभाव न मिळाल्याचा मराठवाडय़ात मोठा फटका; प्रचारात मुद्दा दुर्लक्षित

जिल्हा परिषद व पंचायत समिती या शेती आणि ग्रामीण भागाच्या समस्येवर लक्ष ठेवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराच्या मुद्यात एक महाराष्ट्राचा गहन प्रश्न बनलेला शेतकरी आत्महत्या हा विषय दुर्लक्षित राहिला आहे. नेत्यांची परस्परांवर चिखलफेक सुरू असतानाच १३ ते २२ फेब्रुवारी या दहा दिवसांत मराठवाडय़ातील १० शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले आहे. शेतकरी आत्महत्येसह कांदा, तुरीचे गडगडलेले दर, रस्ते, पाणी, वीज हे प्रश्नही आरोप-प्रत्यारोपांच्या गर्दीत हरवून बसले होते.

कन्नड तालुक्यातील नेवपूर येथील सतीश शिवाजीराव सोळंके यांनी १३ फेब्रुवारी रोजी गंगामाई कारखान्याच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. हिमगोलीतील सेनगाव तालुक्याच्या सवना येथील शेतकरी सुभाष सखाराम नायक यांनी १४ रोजी गळफास घेऊन जीवन संपवले. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्याच्या सौताडा येथील प्रल्हाद आनंद सानप यांनी १५ फेब्रुवारी रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. नांदेड, परभणी, बीड जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांनी १८ फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन जीवन संपवले. नायगाव तालुक्यातील अंतरगावचे रघुनाथ मुंजाजी ईबितवार, हदगावातील बरड शेवाळाचे धुरपतराव राघौजी दहिभाते, अंबाजोगाईतील राजेवाडी येथील हनुमंत महादेव काशिद व पूर्णेतील आव्हई येथील शिवाजी रामराव पवार या चार शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पठण तालुक्यातील आंतरवाली खांडीचे एकनाथ नारायण डिघुळे यांनीही आत्महत्या केली. गंगापूर तालुक्याच्या शिंगी पिप्री येथील अल्पभूधारक शेतकरी अशोक मिच्छद्र सटाले यांनी नांदूर मधमेश्वर कालव्यात उडी घेऊन १९ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली.

कर्जमाफीचा मुद्दा दुर्लक्षित

एकीकडे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार, १६ फेब्रुवारी रोजी मतदान झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच होते. प्रचारात कांद्याचे गडगडलेले दर, तुरीच्या भावातील घसरण आणि खरेदी केंद्रावर हमीपेक्षा मिळणारा कमी भाव याशिवाय ग्रामीण भागातील रस्ते, शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणाऱ्या विजेचा प्रश्न, शेतकरी कर्जमाफी असे मुद्देच चच्रेत आले नाहीत.