दोन वर्षांपासून दुष्काळाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून काही शेतकरी महाराष्ट्र बँकेत पीककर्जासाठी खेटे घालत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या फाईल बँकेने गहाळ केल्या. शनिवारी बँक बंद असतानाही शेतकऱ्यांना बोलावून दिवसभर ताटकळत ठेवले. अखेर आज सुटीमुळे तुमचे काम होणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्ह्यास चालू आर्थिक वर्षांत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सर्व राष्ट्रीयीकृत खासगी व सहकारी बँकांना ९३८ कोटी ५० लाखांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्याची सुरुवात एप्रिलपासून करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. काही बँकांनी पीककर्ज वाटपास एप्रिलमध्ये सुरुवात केली. मात्र, काही बँकांनी एप्रिलमध्ये पीककर्ज वाटप सुरू केले नव्हते. जिल्हा प्रशासनाने पीककर्जासंबंधी बँक अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बठकीत महाराष्ट्र बँकेच्या हिंगोली शाखेकडून पीककर्जासंबंधी माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याकडे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश मदान यांनी लक्ष वेधले होते. या बँकेने उशिरा मे महिन्यात पीककर्ज वाटपास सुरुवात केली. बँकेकडे कर्मचाऱ्यांची कमतरता व पीककर्जासाठी वाढते प्रस्ताव लक्षात घेता शेतकऱ्यांना बँकेसमोर ४-४ दिवस ताटकळत राहावे लागत आहे.