दुष्काळी मदतीच्या नावाखाली पुढाऱ्यांनी सुरू केलेल्या छावणी उत्सवाला लगाम घालण्यास प्रशासन २ महिने छावण्या बंद करण्याच्या विचारात असतानाच नांदूरफाटा येथे छावणी सुरू करण्याच्या मागणीसाठी १५ गावांतील शेतकरी जनावरांसह रस्त्यावर उतरले. त्यामुळे दोन तास वाहतूक बंद झाली. केजजवळ कळंबअंबा ग्रामपंचायतीतील गरकारभाराच्या निषेधार्थ महिलांनी रास्ता रोको करून आमदार संगीता ठोंबरे यांची गाडी अडवली. अंगणवाडीत काम करणाऱ्या महिलांनी जि.प.वर मोर्चा काढून मागण्यांकडे लक्ष वेधले. या आंदोलनांनी सोमवारी दिवसभर प्रशासकीय यंत्रणा बेजार झाली.
जिल्ह्यात दुष्काळी स्थितीत गुरांचा सांभाळ करण्यासाठी मदत म्हणून सरकारने छावण्या सुरू केल्या. मात्र, राजकीय पुढाऱ्यांनी सरकारी अनुदानाच्या उद्योगातून छावणी उत्सव सुरू केल्याने जानेवारीअखेर छावण्यांनी दीडशेचा आकडा पार केला. रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक उपलब्ध झाल्याने जिल्हा प्रशासनाने छावणी उत्सवाला लगाम घालण्यासाठी दोन महिने छावण्या बंद करण्याचा अहवाल सरकारकडे पाठवला. त्यावर दि. १५पर्यंत छावण्या बंद करण्याचा निर्णय होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे छावणीचालकांत अस्वस्थता पसरली. वेगवेगळय़ा मार्गानी दबावाचे राजकारण सुरू झाले. केज तालुक्यातील नांदूरफाटा येथे गुरांसह शेतकरी छावणीच्या मागणीसाठी सोमवारी रस्त्यावर उतरले. परिणामी, दोन तास या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली. धनंजय भोसले, नितीन चाटे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
केज रस्त्यावर कळंबअंबा येथील महिलांनी गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीतील गरकारभाराच्या विरोधात रास्ता रोको सुरू केले. महिलांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. याच वेळी केजच्या भाजप आमदार संगीता ठोंबरे या ठिकाणी आल्या. या वेळी त्यांची गाडी अडवण्यात आली. ठोंबरे यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेतले. त्या वेळी महिलांनी आक्रमकपणे गरकारभार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. अंगणवाडीत काम करणाऱ्या कार्यकर्ता व मदतनीस महिलांनी जि.प.वर दुपारी मोठय़ा संख्येने मोर्चा काढून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरले.