परभणी तालुक्यातील पाथरगव्हाण बु. येथील शेतकरी अंकुश रघुनाथ घांडगे (वय ५०) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात गावातीलच तीन खासगी सावकारांवर घटनेच्या पाचव्या दिवशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेच्या दिवशीच मृताच्या मुलाने तक्रार दिली होती. मृताजवळ सापडलेल्या चिठ्ठीत या सावकारांच्या नावाचा उल्लेख होता; पण पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते.
पाथरगव्हाण येथील अंकुश घांडगे या शेतकऱ्याने गेल्या २८ एप्रिलला गावापासून एक किमी अंतरावरील शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. उपचारादरम्यान पारी ग्रामीण रुग्णालयात त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. पोलीस पंचनामा करतेवेळी शेतकऱ्याच्या खिशात आत्महत्येची चिठ्ठी सापडली. सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे व आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये गावातील ३ सावकारांची नावे लिहिली असल्याचे दिसत असताना पोलिसांनी मात्र कारवाई केली नाही. एवढेच नव्हे, तर मृत शेतकऱ्याचा मुलगा गजानन यांनी या प्रकरणी २८ एप्रिलला तक्रारही दिली होती. मात्र, पोलिसांनी घटनेच्या पाचव्या दिवशी सोमवारी रात्री उशिरा या प्रकरणी अन्सीराम नामदेव घांडगे, तुकाराम सखाराम घांडगे व सूर्यकांत आसाराम घांडगे या तीन सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मुलीच्या लग्नासाठी पसे घेतले होते
अंकुश घांडगे यांना पावणेदोन एकर शेती आहे. दोन मुली व दोन मुले असा त्यांचा परिवार. एका मुलीचे लग्न २०१३ मध्ये केले. या वेळी गावातील या तिन्ही सावकारांकडून त्यांनी २ लाख रुपये ५ टक्के व्याजाने घेतले होते. गतवर्षी एक लाख व्याजाची रक्कम देऊनही या सावकारांकडून पुन्हा पशासाठी तगादा लावला जात होता. पसे दिले नाही तर जमिनीचे खरेदीखत करून दे म्हणून सतत त्रास दिला जात होता. यातूनच ही आत्महत्या घडली.