ही गोष्ट आहे सहा भावंडांची. त्यांच्यातल्या प्रेमाची, जिव्हाळ्याची,कष्टाची आणि यशाच्या दिशेने सुरु असलेल्या त्यांच्या वाटचालीची. वडिलांच्या मृत्यूनंतर आई आणि ताईने पार पाडलेल्या बाबांच्या भूमिकेची. लातूर जिल्ह्यातलं उदगीर हे गाव. अशोकराव बिरादार एसटी महामंडळात वाहक म्हणून नोकरीला होते. अशोकराव आणि सुशीला बिरादार यांना पाच मुली आणि एक मुलगा अशी सहा लेकरं होती. सुशीला यांना भाऊ नाही. वडिलांच्या आजारपणात त्यांच्या उपचाराची सारी जबाबदारी त्यांच्यावर असल्याने त्या माहेरी गेलेल्या. आजारपणात वडिलांचा मृत्यू झाला. वृद्ध आईसाठी त्यांनी कुटुंबासह माहेरीच राहण्याचा निर्णय घेतला. परभणी जिल्ह्यातील दैठणा हे त्यांचं माहेर.

अशातच ड्युटीवर असताना २५ आक्टोंबर २००८ मध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने अशोकराव बिरादार यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर पतीचा मृत्यू हा दुसरा धक्का होता. एकपाठोपाठचे दोन धक्के पचवत त्यांना कुटुंबाला सांभाळायचे होते. ही घटना घडली त्यावेळी त्यांचा लहान मुलगा अवघ्या आठ वर्षांचा होता. तर मुली शाळा महाविद्यालयात शिकत होत्या. आज त्यांची सहाही लेकर उच्चशिक्षित आहेत. पतीच्या मृत्यूनंतर सांत्वन करण्यासाठी आलेले नातेवाईक अनेक प्रश्न उपस्थित करून जायचे. मात्र स्वतः आठवी शिकलेल्या सुशीलाताईंनी मुलीना शिकवण्याचा निर्णय घेतला. खेडेगावत पाच मुली शिक्षण घेत असल्यानं अनेकजण लग्न उरकून टाकण्याचा सल्ला द्यायचे. मात्र मी शिकले नाही मुलींना शिकवणार हा त्यांचा निर्धार पक्का होता. त्यांच्या निर्धाराला मोठी मुलगी अनुराधा हिचं पाठबळ मिळायचं. इंजिनियरिंगच शिक्षण घेतलेली अनुराधा त्यावेळी नोकरी करायची.

अनुराधाहून लहान असलेली सीमा पदवीच शिक्षण घेत होती. तिच्यापेक्षा लहान असलेल्या कोमलच बारावीच वर्ष होतं. प्रियंका दहावीच्या वर्गात शिकत होती. तर आश्विनी आणि शिवप्रताप प्राथमिक शाळेत धडे गिरवत होते. आता कुठं बाराखडीची ओळख झालेल्या शिवप्रतापला वडिलांच्या प्रेमाचा ओलावा जाणवायच्या अगोदर त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता.पाच मुली असल्यामुळे फुकटची काळजी दाखवणारे अनेक जण होते. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांना स्वतः शोधायाचं होतं. म्हणून आईसोबत त्या मुलांसाठी बाबाही झाल्या. नऊ वर्षांचा काळ लोटला त्यांनी मुलांना कधी वडिलांची उणीव जाणवू दिली नाही. खेड्यात राहूनही मुलांना त्यांच्या आवडीच शिक्षण दिलं. आज प्रत्येकजण त्याच्या क्षेत्रात पुढचं पाऊल टाकतोय. स्वतःच्या मुलांसोबतच त्यांनी बहीण नंदालाही आपल्या मुलींना शिकवण्यासाठी पाठबळ दिलं. त्याही उच्च शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

पदवीचं शिक्षण घेत असलेल्या सीमाला एमएससी कॉम्प्युटर सायन्सपर्यंत शिकवलं. कोमलनं इंटरनॅशनल जर्नालिझम केलं. तर बीएस्सी कंप्युटर करून प्रियंकाने फॅशन डिझायनरचा डिप्लोमा केला. पाचवीच्या वर्गात शिकत असलेली आश्विनी आता मेकॅनिकल इंजिनरिंगच्या शेवटच्या वर्षात आहे. तर लहानग्या शिवप्रतापने ८१ टक्के गुणांसह इंजिनरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला असून तो पदवीच शिक्षण घेणार आहे. शिक्षणाच्या शिडीवरून पाचही लेकरांची यशाकडे वाटचाल सुरु आहे. त्यांचं हे यश पहायला त्याचे वडील नाहीत. त्यामुळं आज सगळे त्यांना खूप मिस करत आहेत. आई आणि बाबाची भूमिका पार पाडत असलेल्या सुशीला ताईंना लेकरांनी मिळवलेल्या यशाचा आणि लेकरांना खेडेगावात राहून ग्लोबल विचारसरणी असलेल्या आपल्या आईचा आभिमान आहे.