औरंगाबाद शहरातील जुना बाजार परिसरामधील अमोदी कॉम्प्लेक्समधील घरात प्राध्यापक महिलेचा मृतदेह आढळल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. लुबना मसरहत (वय ४४) असं मृत महिलेचे नाव आहे. शहरातील मॉडेल अध्यापक महिला महाविद्यालयात त्या अध्यापनाच काम करत होत्या.  लुबना यांचे पती शेख मोहम्मद जुनेद बँकेत काम करतात. हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी शहरातील जामा मशिद या ठिकाणी लावण्यात आलेल्या बँकेच्या कँम्पमध्ये ते कार्यरत होते. कामाच्या ठिकाणी उशीर झाल्यानंतर ते घरी जात नसत.  त्यामुळं लुबना एकट्याच घरी होत्या. त्यानं मुलबाळही नाही.

चार दिवसांपूर्वी फोनवरून त्यांच्याशी बोलणं झाल्याचं त्यांच्या पतीनं सांगितलं. लुबना यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा, असे नातेवाईकांनी म्हटले आहे. लुबना मसहरत ज्या महाविद्यालयात नोकरी करत होत्या त्याच संस्थेच्या दुसऱ्या महाविद्यालयात त्यांची बहीण नोकरीला आहे. दोन दिवसांपूर्वी ती लुबाना यांना भेटण्यासाठी घरी आली होती. पण दार बंद असल्यामुळे बहीण दारातूनच परत गेली. लुबाना फोनही उचलत नसल्यानं आज त्यांची बहीण पुन्हा घरी आली. दार ठोठावून देखील प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिसांना याप्रकरणी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थित दार तोडण्यात आले. यावेळी घरात लुबना यांचा मृतदेह आढळला. चार ते पाच दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात  पाठवण्यात आला असून शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.