नॅनो तंत्रज्ञानात शेती उत्पादन वाढविण्याची क्षमता आहे, परंतु नॅनो तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर व मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबाबत संशोधनाची गरज असल्याचे प्रतिपादन जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता तथा मृदाशास्त्रज्ञ डॉ. पी. चंद्रशेखर राव यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग व परभणी येथील भारतीय मृदाविज्ञान संस्थेच्या वतीने कै. डॉ. एन. पी. दत्ता मेमोरियल व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलु होते.

पीक वाढीकरिता रासायनिक खतांचा वापर करताना खत प्रत्यक्षात कमी प्रमाणात पिकांना लागू होतात, नॅनो खतांचा वापर केल्यास रासायनिक खतांचा कार्यक्षमरीत्या वापर होऊन कमी खत मात्रेत अधिक उत्पादन आपण घेऊ शकू, असे प्रतिपादन डॉ. राव यांनी केले.

कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलु अध्यक्षीय समारोपात म्हणाले की, देशात युरिया या नत्र खताचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो, यासाठी मोठय़ा प्रमाणावर सबसिडी दिली जाते. परंतु युरियाचा वापर करताना त्याचा मोठय़ा प्रमाणावर ऱ्हास होतो. ही हानी पाच टक्के जरी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून कमी केली, तरी मोठय़ा प्रमाणावर आíथक बचत करू शकतो. कृषिक्षेत्रात नॅनो तंत्रज्ञानाचा उत्पादन वाढीसाठी वापर शक्य आहे, जैवसुरक्षितता, पर्यावरण अनुकूलता व खर्च परिमाणकारकता आदीच्या दृष्टीने नॅनो तंत्रज्ञानाचा संशोधनात्मक अभ्यास करावा लागेल. शिक्षण संचालक डॉ. ढवण आपल्या भाषणात म्हणाले, की भारतीय मृदाविज्ञान संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या व्याख्यानांचा उपयोग नवसंशोधकांसाठी मार्गदर्शक आहे.