औरंगाबादमधील वाळूज औद्योगिक वसाहतीमधील घाणेगाव शिवारातील गट नंबर ४६ मधील प्लास्टिक कंपनीत बुधवारी स्फोट झाला. या स्फोटात एक जण गंभीर जखमी झाला. चहा पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक कपचे उत्पादन करणाऱ्या कंपनीत दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागली. या अपघातामध्ये कंपनी मालकाचा मुलगा गंभीर भाजला असून, त्याच्यावर स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आगीमुळे कंपनीतील सर्व साहित्य जळून खाक झाले. यात दोन लाख रुपयांसह कोट्यवधीचे आर्थिक नुकसान झाले.

वाळूज औद्यागिक क्षेत्रातील घाणेगाव शिवारात दिलीप बारगळ यांची सुनंदा इंडस्ट्रीज या नावाने प्लास्टिक कप तयार करण्याची कंपनी आहे. या कंपनीत बारगळ यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील अजय बारगळ, सचिन बारगळ, मीरा बारगळ, सोनाली बारगळ यांच्यासह राजू डोईफोडे, सुमन बारगळ असे जेमतेम १० कामगार काम करत होते. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कंपनीतील कामगार जेवण करत असताना कंपनीच्या मागील बाजूने धूर येत असल्याचे कामगारांना दिसले़. त्यानंतर आरडाओरडा सुरु झाला. यावेळी कंपनीचे मालक दिलीप बारगळ यांचा मुलगा सचिन बारगळ हा कंपनीतील कपाटातील ऑर्डरचे दोन लाख रुपये घेण्यासाठी कंपनीत गेला. याचवेळी कंपनीत स्प्रेसाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलचा अचानक स्फोट होऊन आग भडकली. या आगीत सचिन गंभीर जखमी झाला. कंपनीला आग लागल्याची महिती मिळताच वाळूज एमआयडीसी अग्निशमक दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून तासाभराच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली़.

आगीत कंपनीतील अंदाजे प्रत्येकी २८ ते ३० लाख रुपये किंमतीच्या ४ मशिन, कच्चा आणि पक्का माल, २ लाख रुपयांची रोकड, केबिनसह महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. या प्रकरणी उशिरापर्यंत वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. तसेच आगीचे कारणही समजू शकलेलं नाही.