मराठवाडय़ातील जालना येथे ड्रायपोर्ट उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अर्थात जेएनपीटीच्या माध्यमातून जालना येथे १५९ हेक्टर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या ड्रायपोर्टमुळे या भागात उत्पादित होणाऱ्या तसेच मराठवाडय़ातील उद्योजकांना त्यांचा माल वेगाने पाठविण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी ड्रायपोर्टची घोषणा दोन वर्षांपूर्वी झाली. भूसंपादनानंतर आता ड्रायपोर्टचे नियोजन जवळपास पूर्ण होत आले आहे. आता संपादित जागेवर संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

पोर्ट किती आणि कोठे?

देशभरात १२ बंदरे आहेत. जेएनपीटी, मुंबई, कांडला, कोलकत्ता, हलदिया, पारादीप, विजाग, चेन्नई, तुतीकोरेन, कोचीन, न्यू मंगलोर, गोवा याशिवाय काही खासगी व महत्त्वाच्या पोर्टहूनही माल पाठविला जातो. यात मुंद्रा, पीपाव, दिघी, इन्नोरे, गंगावरम आणि वाल्लारपदम येथूनही माल पाठवला जातो. नव्याने ४ पोर्ट उभारण्याचा प्रस्ताव आहे. यात हजिरा, रिवास, सागरबंदर, व्हिझिन्जाम येथे पोर्ट उभारले जाणार आहेत. राष्ट्रीय वाहतूक धोरणानुसार २०१६-१७ मध्ये होणारी २०६ मेट्रिक टन कंटेनरची वाहतूक २०३०-३१ पर्यंत ६६२ मेट्रिक टन कंटेनपर्यंत वाढवायची आहे. असे करायचे झाल्यास काही ठिकाणी ड्रायपोर्ट करणे आवश्यक होते. म्हणून मराठवाडय़ातील जालना येथे ड्रायपोर्ट उभारण्यात येत आहे.

जालना येथे ड्रायपोर्ट कशासाठी?

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरमुळे या भागात उद्योग येतील आणि त्याची मोठी उलाढाल सुरू होईल, असे मानले जाते. सध्या मराठवाडय़ात नऊ उत्पादक क्लस्टर आहे. ४८ औद्योगिक वसाहती आहेत. दोन आयटी पार्क आहेत. तसेच १५ एसईझेड मंजूर आहेत. मराठवाडय़ात तुलनेने पाण्याची कमतरता असल्याने ऑटोमोबाइल उद्योगांना मोठा वाव आहे. स्कोडा, फॉक्सवेगन, ऑडीसारख्या आलिशान गाडय़ांचे उत्पादन औरंगाबाद येथे होते. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरमुळे या उत्पादनात वाढ होईल, असे मानले जाते. त्यामुळे निर्यातीत वाढ होणार आहे. केवळ ऑटोमोबाइल नाही तर कोल्डस्टोरेज चेन विकसित झाल्यास त्या माध्यमातून कृषी-उत्पादनाच्या निर्यातीला मोठी चालना मिळणार आहे. सध्या राज्यात ५५५ शीतगृहांमध्ये ७ लाख ६२ हजार ९७८ मेट्रिक टन माल साठवणुकीची व्यवस्था आहे. ८० टक्के शीतगृहे खासगी मालकीची आहेत, तर २० टक्के सहकारी तत्त्वावरची आहेत. या सर्वाचा विचार करून वाहतुकीच्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी ड्रायपोर्ट उपयोगी पडणार आहे.

ड्रायपोर्टमध्ये कोणत्या सुविधा असतील?

कंटेनर यार्ड- ड्रायपोर्टमधील ११.५ हेक्टर जमीन यार्ड कंटेनरसाठी ठेवली जाणार आहेत. निर्यातीच्या मालाचे कंटेनर स्वतंत्रपणे ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

गोदाम

गोदामापर्यंत रेल्वे रूळ असणारी व्यवस्था असेल. येथे माल ठेवताही येईल आणि तेथून तो पुढे पाठवताही येईल. माल साठवणुकीसाठी आणि गोदाम यासाठी ८.७ हेक्टर जागा पहिल्या टप्प्यात आवश्यक असणार आहेत. शीतगृहांसाठी ३ हेक्टर जागा ठेवण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या तापमानातील या शीतगृहांमुळे कृषी माल साठवणूक करणे सोपे जाईल.

  • मालवाहतूक करण्यासाठी ड्रायपोर्टपासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत स्वतंत्र रूळ टाकले जातील. हवाई वाहतुकीसाठी आणि रेल्वे स्टेशनपर्यंत याचा चांगला उपयोग होऊ शकतो.
  • वजनकाटे, ट्रक टर्मिनल्सची व्यवस्थाही ड्रायपोर्टमध्ये होऊ शकते.
  • जालन्यामध्ये अनेक ठिकाणी तेल उत्पादक गिरण्या आहेत. याचा त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. सरकी, शेंगदाणा, सोयाबीन या पिकांना ही सुविधा अधिक फायद्याची आहे. ड्रायपोर्टची जागा समतल करण्यासाठी ११६ कोटी ८३ लाख रुपये लागतील, असा अंदाज आहे.
  • ड्रायपोर्टसाठी पहिल्या टप्प्यात ४५८ कोटी, दुसऱ्या १९० कोटी, तिसऱ्या टप्प्यात २१४ कोटी रुपयांची गरज आहे. एकूण ८६३ कोटी  या प्रकल्पासाठी भांडवली खर्च आहे.

संकलन : सुहास सरदेशमुख