लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीसाठी औरंगाबाद विभागातून ५ संघ बुधवारी निवडण्यात आले. डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्यशास्त्र विभागाची ‘भक्षक’, नाटय़शास्त्र विभागाची ‘देवदासी’, बीडच्या एस. के. एस. महाविद्यालयाची ‘भोग’, तसेच जळगावच्या जेठा महाविद्यालयाची ‘साधूच्या डोहात’ व रायसोनी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटच्या ‘आसुसलेला दोरखंड’ या एकांकिका या फेरीत दाखल झाल्या. त्यांचे सादरीकरण ६ ऑक्टोबरला होईल.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने आयोजित लोकसत्ता-लोकांकिका स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धकांमध्ये दांडगा उत्साह होता. प्राथमिक फेरीत एकूण १५ एकांकिका सादर झाल्या. मंगळवारी मराठवाडा व खान्देशातून आलेल्या ८ संघांनी एकांकिका सादर केल्या. सतत पडणारा दुष्काळ, लैंगिक विकृतीचे प्रश्न, त्यात महिलांची फरपट, अंधश्रद्धा यासह नातेसंबंधांवर प्रकाश टाकणाऱ्या संहिता विद्यार्थ्यांनी हाताळल्या.
परीक्षक अमेय उज्ज्वल व पद्मनाभ पाठक यांनी केलेल्या परीक्षणानुसार ५ संघांची निवड जाहीर झाली. ‘लोकसत्ता’चे मुख्य वितरण व्यवस्थापक मुकुंद कानिटकर, मुख्य जाहिरात व्यवस्थापक संदीप ऋषी, आयरिस प्रॉडक्शन हाऊसचे अभय परळकर यांची या वेळी उपस्थित होते.