बनावट नोटा तयार करणाऱ्या माजिद खान बिस्मिला खान (वय ४२) या तोतया पत्रकाराला औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख ५ हजार तीनशे रुपयांच्या बनावट नोटा आणि नोटांची छपाई करण्यासाठी वापरण्यात येणारी अत्याधुनिक छपाई यंत्र जप्त करण्यात आली आहेत.

औरंगाबादमधील किरडपुरा-बायजीपुरा भागातून या आरोपीला पोलिसांनी अटक केली. दोन हजार, पाचशे आणि शंभर रुपयांच्या बनावट नोटा पोलीस कारवाईत सापडल्या. बनावट नोटा या उच्चप्रतिच्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं. शिवाय २३ हजार रुपये किमतीच्या खऱ्या नोटाही पोलिसांना सापडल्या. बनावट नोटा तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जात असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे. खान चलनातील खऱ्या नोटांच्या मोबदल्यात दुप्पट बनावट नोटा द्यायचा. आरोपी स्वतःला पत्रकार असल्याचं सांगत होता. त्याच्याकडून ‘लोकरतन’ या दैनिकाचे ओळखपत्र तसेच काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचं ओळखपत्र मिळालं आहे. दोन्ही ओळखपत्रे बनावट असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

आरोपीच्या मित्राने पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाई करणारे पोलीस आणि या तोतया आरोपीची माहिती देणाऱ्या व्यक्तीला आयुक्त यशस्वी यादव यांनी वीस हजाराचा बक्षीस जाहीर केलं.