राज्यात अनिष्ठ प्रथांविरोधात कायदे करण्यात आले. पण स्त्रीभ्रूण हत्या, हुंडा बळी हे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. समाजातील या प्रश्नांवर तरुणाईच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे बुधवारी औरंगाबादच्या दौऱ्यावर आल्या होत्या. औरंगाबादमधील देवगिरी आणि सरस्वती भुवन महाविद्यालयात तरुणाईशी त्यांनी स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, मुलींची छेडछाड आदी ज्वलंत मुद्द्यावर संवाद साधला. सामाजिक बदलांची सुरुवात स्वतःपासून केल्यास प्रश्न सहज सुटू शकतील. त्यामुळे प्रत्येकाने त्याची स्वतः पासून सुरुवात करायला हवी, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी तरुणाईला केले.

यावेळी आरक्षण आर्थिक निकषावर असावे की सामाजिक असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर त्या म्हणाल्या की, आम्ही धनगर, मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्नशील आहोत. विचारांची पूर्तता करुन सरकारने आरक्षण द्यायला हवे. विरोधी बाकावर बसून कोणतीही मागणी करणे सोपे असते. आम्ही आज जी मागणी करत आहोत, ती उद्या सत्तेत आल्यानंतर आम्हालाही पूर्ण करता यायला हवी. मागणीची पूर्तता करणे शक्य आहे का? याचा अभ्यास करुन योग्य निर्णय घ्यावा लागतो. आरक्षणाच्या बाबतीत भविष्याचा विचार करुन सरकारने योग्य तो निर्णय घ्यायला हवा.

यावेळी त्यांनी राज्यातील भारनियमनाच्या मुद्यावर सरकारवर निशाणा साधला. कर्नाटक आणि गुजरातमध्ये भारनियमन नाही मग महाराष्ट्रातच भारनियमन का? असा प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली. कोळशाचं नियोजन चुकल्याचे शरद पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी पत्र पाठवून सांगितल होते. मात्र, त्यावेळी प्रत्येक राज्यात दोन महिन्याचा कोळसा अधिक आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले. मग आता राज्यात भारनियमन का होते आहे? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला.