ऊस उत्पादक आणि ऊस कारखानदारांच्या विरोधात सरकारने ठामपणे उभे राहायला हवे, असे मत संवेदना यात्रेचे प्रमुख प्रा. योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले. औरंगाबाद जिल्ह्य़ातील हतनूर येथे त्यांनी शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली. या अनुषंगाने पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील रोजगार हमीच्या कामाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि नव्या योजना देणाऱ्या राज्यात जेव्हा गरज असते तेव्हा वाईट पद्धतीने एखादी योजना सुरू असावी, हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले.
संवेदना यात्रा तेलंगणामधून महाराष्ट्रात येत असताना काही महत्त्वपूर्ण आणि चांगले बदल पाहायला मिळू शकतात, असे वाटले होते. मात्र,  रोजगार हमी योजनेचे काम पाहिले आणि आश्चर्य वाटले. सर्वाकडे जॉबकार्डच नाहीत आणि असलेले जॉबकार्डही ठेकेदारांकडेच आहेत. केवळ जॉबकार्डच नाही तर मजुरांचे एटीएम कार्डसुद्धा त्यांच्याकडेच आहे. ही योजना अतिशय वाईट स्थितीत सुरू आहे. रोजगार हमीवर लोक कामावर येण्यास इच्छुक नाही, असे म्हणणे म्हणजे क्रूर थट्टा असल्याचे ते म्हणाले. मुळात या भागात ऊस लावू नये, अशी स्थिती आहे. खरेतर राज्य सरकारने राजकीय आणि आर्थिक हित लक्षात घेऊन कारखानदारांच्या विरोधात उभे ठाकण्याची गरज आहे. दुष्काळाला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार जबाबदार आहेत, या आरोपाबाबत फारसे बोलणे त्यांनी टाळले. ही राजकीय विश्लेषणाची वेळ नाही आणि असे व्यक्तिकेंद्रित स्वरूप त्याला देऊ नये. हा दुष्काळ मानवनिर्मित असल्याने त्यावर मात करण्यासाठी सर्वानी एकत्रित यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.