डॉ. सुब्रह्मण्यम यांचे प्रतिपादन

मेंदू मृतावस्थेतील व्यक्तीचे हात, किडनी, हृदय आदी अवयव जसे इतर रुग्णांच्या कामी येतात, तसे त्याच्या हातांचेही प्रत्यारोपण गरजवंतावर करता येऊ शकते. त्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे, असे मत असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व शस्त्रक्रियेद्वारे हाताचे देशात प्रथमच प्रत्यारोपण करणारे डॉक्टर सुब्रह्मण्यम अय्यर यांनी येथे व्यक्त केले.

येथील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. एमजीएममध्ये सुरू असलेल्या विभागीय प्लास्टिक सर्जरी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आलेले डॉ.अय्यर यांनी हाताच्या प्रत्यारोपणासंबंधीची माहिती दिली. जानेवारी २०१५ मध्ये देशात हाताचे प्रत्यारोपण करणारी पहिली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या बोटांची दोनच दिवसात हालचाल सुरू झाली. हात गमावलेल्या व्यक्तींसाठी ब्रेन डेड माणसाचे अवयव कामी येत आहेत. ब्रेन डेड व्यक्तींच्या हातांचे इतरांवर शस्त्रक्रियेद्वारे प्रत्यारोपण करता येते हे यशस्वीरीत्या सिद्ध झालेले आहे आणि त्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे, असे डॉ. अय्यर म्हणाले. चेहऱ्याचा अर्धागवायूही आता नव्या तंत्रज्ञानाधारित शस्त्रक्रियेद्वारे पूर्णपणे दुरुस्त होऊ शकतो, असेही डॉ. अय्यर यांनी सांगितले.

एमजीएमचा उद्या पदवीदान सोहळा

एमजीएम इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ सायन्सचा सातवा दीक्षान्त समारंभ मंगळवारी सकाळी आयोजित करण्यात आला आहे. या समारंभासाठी अमेरिकेतील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मायकेल रिअर्डन यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यासाठी एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, डॉ. के. जी. नारायणखेडकर, कुलगुरू डॉ. सुधीरचंद्र कदम, कुलसचिव राजेश गोयल आदी उपस्थित राहणार आहेत.