भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त शहर जिल्हा काँग्रेसतर्फे शनिवारी येथे भव्य कार्यक्रम होणार आहे. या निमित्त पक्षाने उभारलेल्या सुसज्ज व्यासपीठावरच दुसऱ्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम होणार आहे.
राज्याच्या व जिल्ह्य़ाच्या राजकारणात काँग्रेस व शिवसेना हे दोन पक्ष भिन्न विचारधारेचे असले, तरी त्यांच्यातील सौहार्द-सुसंवादाचे अनेक दाखले आहेत. याच सौहार्दातून नवा मोंढय़ातील पटांगणात उभारलेल्या भव्य व्यासपीठावर दोन राजकीय पक्षांचे कार्यक्रम काही तासांच्या अंतराने होत आहेत. राज्यात शिवसेना-भाजपची राजवट असताना १९९५ मध्ये त्या सरकारने तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचा सत्कार घडवून आणला, तर आताच्या सरकारने चव्हाण यांच्या जायकवाडी परिसरातील पुतळ्याचे अनावरण केले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे दोन मंत्री उपस्थित होते. दोन पक्षांमधील ऋणानुबंधाचे धागे नांदेडमध्येही आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणारे खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्याला इतर पक्षांनीही मदत केली होती, असे वक्तव्य अलीकडेच केले होते.
या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असतानाच बुधवारी सायंकाळनंतर सेनेच्या एका आमदारासह अन्य काही कार्यकर्त्यांनीही वरील व्यासपीठाची, त्या लगतच्या दुसऱ्या छोटय़ा व्यासपीठासह आसन व्यवस्थेची पाहणी केली, असे कळते. या माहितीला पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दुजोराही मिळाला. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या रविवारी (दि. २९) होणाऱ्या कार्यक्रमस्थळाची अधिकृत घोषणा शिवसेनेने अजून केली नाही.
डॉ. आंबेडकर यांना आदरांजलीचा काँग्रेसचा कार्यक्रम शनिवारी (दि. २८) दुपारी ४ ते रात्री १० पर्यंत चालणार आहे. यानंतर तेथील नेपथ्यरचना, काँग्रेसचे झेंडे व अन्य काही बदलून शिवसेना तेथे भगवेकरण करणार आहे. पक्षप्रमुखांचा कार्यक्रम कोठे आयोजित करावा, असा विचार शिवसेना पदाधिकाऱ्यांत सुरू होता. पूर्णा रस्त्यावरील पावडे मंगल कार्यालयालगतच्या जागेचाही विचार झाला, असे कळते; पण पक्षाच्या आमदाराने काँग्रेसमधील संयोजकांशी चर्चा करून व्यासपीठाची पाहणी केल्यानंतर दोन पक्षांमधील सौहार्द, तसेच प्रसंगी एकमेकास साहाय्य करण्याच्या परंपरेची चर्चा सुरू झाली.
काँग्रेसच्या कार्यक्रमाची सारी सूत्रे पक्षाचे विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर यांच्याकडे आहेत. त्यांना पुढील वर्षी निवडणुकीला सामोरे जायचे आहे. मागील वेळी बिनविरोध निवडून येण्याचा त्यांचा मार्ग आज शिवसेनेचे आमदार झालेल्या दोघांनी प्रशस्त केला होता.
कार्यक्रमाचे स्वरूप
उद्धव ठाकरे रविवारी सकाळी नांदेडला येत असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या, तसेच काही अल्पभूधारकांना शेळ्या, रोख मदतीचे वाटप त्यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. आधी हा कार्यक्रम वजिराबाद भागातील मल्टीपर्पज हायस्कूलच्या पटांगणावर घेण्याचे ठरले होते. पण आता नवा मोंढय़ातील मैदान शिवसैनिकांना पसंत पडले आहे. त्यांच्यासमोर मुख्य विषय आहे, तो कार्यक्रमासाठी गर्दी जमविण्याचा. त्या दृष्टीने लोकप्रतिनिधी-पदाधिकारी कामाला लागले आहेत. पक्षाचे राज्यमंत्री विजय शिवतारे बुधवारी येथे आले होते. त्यांनी एका बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सर्वानी बौद्धिक क्षमता वाढवावी, अशा कानपिचक्या दिल्या.