औरंगाबादसह नांदेड, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्य़ांत समाधानकारक पाऊस

मराठवाडय़ात गुरुवारी सर्वदूर जोरदार पाऊस झाला. औरंगाबादसह नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्य़ांमध्येही जोरदार पाऊस झाला. उस्मानाबादेतील पाच, तर लातुरातील चार मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली आहे, तर काही ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे पेरणी खोळंबली आहे. नांदेड जिल्ह्य़ातील अनेक भागात मात्र अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. औरंगाबाद शहरसह पैठण, वैजापूर येथेही जोरदार पाऊस झाला. वैजापूरजवळील नदीला पूर आला होता. शुक्रवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती.

नांदेड तालुक्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. अवघ्या एक ते दीड तासात ७०१३ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी २८.८१ मि.मी. पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यत आतापर्यंत १५.४१ टक्के पडलेल्या पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच तारखेपर्यंत २.७० टक्के सरासरी पावसाची नोंद झाली होती. मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने काही भागात पेरणीला सुरुवात झाली होती. आता सर्वत्र समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी खरीप पिकाच्या पेरणीत मग्न आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यत सरासरीच्या ३१ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील तेर, केशेगाव, पाडोळी व बेंबळी आणि परंडा शहर मंडळात अतिवृष्टी झाली. मान्सूनची सुरुवातच अतिवृष्टीने झाली असून उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक ६० मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. लातूर जिल्ह्य़ात सर्वदूर गुरुवारी रात्रीतून पाऊस झाला. शिरूर ताजबंद, झरी, घोणसी व आंबुलगा या चार मंडलात अतिवृष्टी झाली.

सोलापूर शहर व जिल्हय़ात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत संततधार सुरूच होती. विशेषत: बार्शी भागात ४३ मिलिमीटपर्यंत पावसाचा जोर कायम राहिला.

सातारा जिल्ह्य़ातील खंडाळा परिसरात दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने खंडाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. एका तासात तब्बल ९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे तहसीलदार शिवाजी तळपे यांनी सांगितले. खंबाटकी घाटातही  झालेल्या मुसळधार पावसाने दरड कोसळली आणि रस्त्यावरून मुरुम वाहिल्यामुळे रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला.

पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले

मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली. पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत होते. त्यामुळे वाहतूक संथगतीने सुरु होती. शहरात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या जोरदार सरींमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले. नगर रस्ता, सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, गणेशखिंड रस्त्यासह शहरातील मध्यवस्तीतील छोटय़ा रस्त्यांवरुन पाण्याचे लोट वाहत होते. शासकीय कार्यालये आणि शाळा सुटल्यानंतर पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अनेकांची धावपळ उडाली. पाण्याच्या लोटातून अनेक वाहनचालक मार्ग काढत होते. वाहतूक संथगतीने सुरु असल्याने ठिकठिकाणी कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे २५ ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या.

आंबेनळी घाटात दरड कोसळली

अलिबाग : महाबळेश्वर परिसरात पडत असलेल्या पावसामुळे पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात पोलादपूर हद्दीत शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता  दरड कोसळली.  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्यात आली असून यामुळे ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत झाली आहे.

महाबळेश्वर, सातारा व कोल्हापूरकडे जाण्यासाठी  या मार्गावरून अनेक वाहनांची वर्दळ सुरू असते. दरड कोसळल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या घटनेची माहिती मिळताच बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी त्वरित जाऊन जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविली. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता वाहतूक पूर्ववत झाली.