प्रकल्प तुडुंब; माजलगाव धरणातून पाणी सोडले

बीड जिल्हय़ात दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिल्याने तीन तालुक्यांसह ४० महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, १० वर्षांत पहिल्यांदाच वार्षकि सरासरी ओलांडली. अवघ्या दोन दिवसांत मोठय़ा दोन प्रकल्पांसह मध्यम आणि लघु असे १४४ प्रकल्प तुडुंब भरले. माजलगाव प्रकल्पात ८१ टक्के पाणीसाठा झाला असून, पाण्याची आवक लक्षात घेता सायंकाळी प्रशासनाने एका दरवाजातून २० हजार क्युसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. तर सात वर्षांनंतर िबदुसरा प्रकल्पाच्या दोन्ही सांडव्यावरून पाणी वाहिले असून, पाण्याचा जोर कायम आहे. धरण व नदीपात्राच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला असून, शनिवारी सकाळी काही गावांना पाण्याने वेढा दिल्याने संपर्क तुटला. प्रशासनाने गावोगावी भोंगा फिरवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे बजावले आहे. अतिवृष्टीने चार वर्षांचा दुष्काळ वाहून गेल्याचे चित्र दिसत आहे.

बीड जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शनिवारीही आपला जोर कायम ठेवत २४ तासांत तब्बल ८१.२ मि.मी.चा विक्रम केला. माजलगाव, धारूर, केज या तीन तालुक्यांसह एकूण ४० महसूल मंडलात अतिवृष्टी झाली असून, सर्वाधिक पावसाची नोंद पेंडगावमध्ये १८० मि.मी. झाली. परिणामी, सकाळी नदीकाठच्या अनेक गावांना पाण्याने वेढा दिल्याचे वृत्त धडकले. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे हे तीनही प्रमुख अधिकारी सार्वजनिक माध्यमात थेट संपर्कात असल्याने अडचणीतील गावांना तत्काळ प्रशासकीय यंत्रणेची मदत पोहोचवण्यात आली. शनिवारी सुट्टी असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे बजावून पूरपरिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.

सोन्नाखोटा, उपळी, सिंदफना, िबदुसरा हे प्रकल्प वाहू लागल्याने माजलगाव प्रकल्पात जवळपास दीड लाख क्युसेक पाण्याची आवक वाढल्याने सकाळपर्यंतच हा प्रकल्प ८१ टक्के भरला. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यासह सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी धरणावर जाऊन परिस्थितीची पाहणी करून एका दरवाजातून २० हजार क्युसेकने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. पाणी सोडल्यानंतर पुराचा धोका निर्माण होऊ शकणाऱ्या मनूर, िशपेटाकळी, रोशनपुरा, नागडगाव, सांडचिंचोली, दिपेगाव या गावातील नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले. गोदावरी व सिंदफना या दोन्ही दुथडी भरून वाहू लागल्याने गेवराई आणि माजलगाव तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. रोशनपुरी बंधाऱ्याचे पाणी आजूबाजूच्या शेतात घुसल्याने सांडसचिंचोली गावालाही फटका बसला आहे. माजलगावात घळाटी नदीला पूर आल्याने परभणी-माजलगाव हा राष्ट्रीय महामार्ग काही काळ बंद करण्यात आला होता. रोशनपुरी उच्चपातळी बंधाऱ्याचे तीन दरवाजे उघडण्यात आल्याने उमरी पारगाव, लोणगाव, सिमरी पारगाव, जीवनापूर, साळेगाव, कोथरूड, आनंदगाव, िदद्रुड, आलापूर, बेलोरा, देवळा, एकबुर्जी, सुलतानपूर, महातपुरी, गव्हाणथडी, शेलगाव, रिदोरी या गावांचा संपर्क सकाळी काही काळ तुटला होता. गेवराई तालुक्यातही पावसाचा जोर कायम राहिल्याने िशपेगाव येथे घराची िभत कोसळून अनगर वटाणे यांच्या पंधरा शेळय़ांचा मृत्यू झाला. गोदावरी नदीला पूर आल्याने राजापूरसह १३ गावांना पाण्याने वेढा दिला. बीड शहरातील तेलगाव रोडवर पोल्ट्री फार्ममध्ये पाणी घुसल्याने दोनशेपेक्षा अधिक कोंबडय़ांचा मृत्यू झाला. शिवाजीनगर पोलीस ठाणे दुसऱ्या दिवशीही पाण्यातच होते. अनेक सखल भागामध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले. तालुक्यातील नागझरी येथील वैशाली कळसुले (वय ३३) ही महिला नदीत वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाला.

शिरूर तालुक्यातील रायमोहा ते टाकळवाडी पुलावरून जात असलेली दुचाकी पुरात वाहून गेल्याने दोघे जण बुडाले. त्यापकी एका युवकाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले असून, संदीप गर्जे हा युवक बेपत्ता झाला आहे. परळी तालुक्यातही वाण नदीचे पाणी वाणगावात शिरल्याने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून, सरस्वती नदीवरील बंधारा वाहून गेला. वडवणी तालुक्यात चिंचाळासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. केज तालुक्यातील केजडी नदीला पूर आला असून, अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हदगाव येथे नदीला पूर आल्याने झाडावर अडकून पडलेले बाळासाहेब श्रीरंग बचुटे यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. बीडसह माजलगाव, गेवराई, परळी या शहरांमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचल्याने शहरे जलमय झाली आहेत. बीड शहराजवळील िबदुसरा प्रकल्प सात वर्षांनंतर पहिल्यांदा भरला असून, मध्यरात्रीपासून दोन्ही सांडव्यांवरून दोन फूट पाणी वाहू लागल्याने िबदुसरा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दोन दिवसांत पावसाने जिल्हा झोडपून काढला असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. १० वर्षांनंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात सर्व प्रकल्प तुडुंब भरले. पावसाचा जोर कायम राहिला तर नदीकाठच्या गावांना आता पुराचा धोका निर्माण झाला आहे.