पुष्य नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी जिल्हय़ातील दहाही तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सर्वाच्या चेहऱ्यावरील ताण कमी झाला आहे. लातूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जैसे थे असला, तरी जिल्हय़ातील अन्यत्र तालुक्यांत पावसाने चांगली हजेरी लावली.

गुरुवारी सायंकाळपासून अहमदपूर, चाकूर, उदगीर भागात पावसाने चांगली हजेरी लावली. काही ठिकाणी रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. लातूर शहरात रात्री आठनंतर पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे खरिपाच्या हंगामातील पिकांना जीवदान मिळाले. गेले काही दिवस काही भागांत पिकांपुरता पाऊस, तर काही भागांत अत्यल्प पाऊस अशी स्थिती होती. उदगीर तालुक्यात या वर्षी सर्वात कमी पाऊस झाला होता. गुरुवारच्या पावसाने ही कसर भरून काढली. एकाच दिवसात तालुक्यात ६८.७१ मिमी इतका विक्रमी पाऊस झाला. त्या खालोखाल चाकूर तालुक्यात ६२ मिमी पाऊस झाला. उदगीर तालुक्यातील हेर मंडळात २४ तासांत तब्बल १४१ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे बांध वाहून गेले. शेतातून जोरदार पाणी वाहिल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर मातीचे नुकसान झाले. तीच अवस्था नागलगाव मंडळाची आहे. या मंडळातही तब्बल १०५ मिमी पाऊस झाला. मोघा मंडळात ७८ मिमी, चाकूर तालुक्यातील शेळगाव मंडळात ९२, चाकूर शहरात ८२, अहमदपूर तालुक्यातील हडोळती मंडळात ७२, निलंगा तालुक्यातील मदनसुरी मंडळात ७४, वडवळ नागनाथ येथे ६२ तर रेणापुरात ६० मिमी पावसाची नोंद झाली. उदगीर तालुक्यावर पावसाने चांगली कृपावृष्टी केल्यामुळे उदगीर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बनशेळकी तलावात पहिल्याच मोठय़ा पावसात चांगले पाणी साचले. या वर्षी या तलावातील गाळ काढण्याचे काम उदगीरमधील तरुणांनी केले. त्यामुळे या तरुणांत उत्साहाचे वातावरण आहे.

शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत तालुकानिहाय पडलेला पाऊस मिमीमध्ये, कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे : लातूर २२.२५ (२०३.५२), औसा २१.७१ (२२०.०८), रेणापूर ४४.७५ (२५४.५०), अहमदपूर ४६.१७ (३२२.३१), चाकूर ६२ (३६६.२०), उदगीर ६८.७१ (२६६.१२), जळकोट २३.५० (२७२), निलंगा ४३.३८ (३२५.८१), देवणी ३७.६७ (२५४.३२), शिरूर अनंतपाळ २८.६७ (२७०.९७), सरासरी ३९.८८ (२७६.२८). या वर्षी आतापर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत जिल्हय़ात १०१.३४ टक्के पाऊस झाला. सर्वात कमी औसा तालुक्यात ७९.५६ टक्के आहे. लातूर तालुक्यात केवळ २०३.५२ मिमी पाऊस झाला. जिल्हय़ात वार्षकि सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ३४.४४ टक्के पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस निलंगा तालुक्यात ४५.७३ टक्के, तर सर्वात कमी पाऊस औसा तालुक्यात २७.०४ टक्के झाला.