वाहतूक बंद झाल्याने ५० गावांचा संपर्क तुटला

गेल्या चार   दिवसांपासून रोज सुरू असलेल्या पावसाने जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांतील शेतकऱ्यांची दमछाक झाली. नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहात आहेत. संपूर्ण शिवारात नजर टाकावी तिकडे पाणीच पाणी आहे. शेतीचे नुकसान आता भरून येणे अवघड आहे. शुक्रवारी रात्रभर झालेल्या पावसाने जिल्हय़ातील पन्नासपेक्षा अधिक गावांची कोंडी केली. अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली.

लातूर-उमरगा, लातूर-बिदर, निलंगा-लिंबाळा, लातूर-उदगीर, लातूर-बाभळगाव माग्रे निलंगा यासह अनेक मार्गावरील वाहतूक ठिकठिकाणी पुलावरून मोठय़ा प्रमाणावर पाणी वाहात असल्यामुळे बंद करावी लागली. औराद शहाजनी येथील तेरणा नदीच्या नव्या पुलावरून सुमारे ४ फूट पाणी वाहात असल्यामुळे शनिवारी पहाटे ४ वाजल्यापासूनच मार्गावर पोलीस तनात करून वाहतूक बंद करावी लागली. यामुळे कर्नाटक व आंध्र प्रांताचा संपर्क तुटला आहे. शुक्रवारी निलंगा तालुक्यातील हरीजवळगा येथील कावेरीबाई नारायणराव शिंदे  (वय ६३) ही महिला ओढा ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना वाहून गेली व सुमारे तीन किलोमीटर अंतरावर तिचा मृतदेह सापडला.

मसलगा धरण शुक्रवारी सायंकाळी भरले. धरणाचे दरवाजे वीज बंद असल्यामुळे उघडता येत नव्हते. जनरेटर बंद असल्यामुळे अडचण निर्माण झाली व दरवाजे उघडले नाहीत तर धरण फुटण्याची भीती यामुळे सुमारे शंभर ग्रामस्थांनी दरवाजे उघडण्यासाठी स्वत: कष्ट घेतले व पुढील अनर्थ टळला.

निलंगा तालुक्यातील नणंद लघु प्रकल्प तुडुंब भरून वाहात होता. सांडव्यातून वाहणारे पाणी व प्रकल्पात येणारे पाणी याचे प्रमाण व्यस्त असल्यामुळे प्रकल्प फुटण्याची भीती गावकऱ्यांना वाटत होती. त्यामुळे लघुसिंचन प्रकल्पाचे अभियंते तहसीलदार विक्रम देशमुख यांनी पहाटे २.३०पर्यंत स्वत: लक्ष घालून अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी मेहनत घेतली, त्यामुळे मोठा धोका टळला. निलंगा, शिरूर अनंतपाळ, औसा आदी तालुक्यांतील अनेक गावांत अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झाल्याच्या तक्रारी दुपापर्यंत तहसील कार्यालयात दाखल होत होत्या.

तावरजा, तेरणा व मांजरा यासह सर्व नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तेरणा नदीवरील सर्वच बंधाऱ्यांचे दरवाजे गेल्या दोन दिवसांपासून उघडे ठेवावे लागले असल्यामुळे नदीपात्रातील पाणीसाठा सातत्याने वाढतो आहे. तावरजा मध्यम प्रकल्प शनिवारी सकाळी १०० टक्के भरला. तिरू, देवर्जन मध्यम प्रकल्पही भरून वाहात आहेत. अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान शासनाने भरून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

जिल्हय़ात वार्षकि सरासरीच्या ११३ टक्के पाऊस

लातूर, औसा, रेणापूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ या पाच तालुक्यांत शुक्रवारी अतिवृष्टी झाली. वार्षकि सरासरीच्या ११३ टक्के, तर अपेक्षित पावसाच्या सरासरीच्या १५० टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. सर्वाधिक पाऊस निलंगा तालुक्यात १३० मि.मी. झाला असून, या तालुक्यात अपेक्षित पावसाच्या १९४ टक्के तर वार्षकि सरासरीच्या १४४ टक्के इतका पाऊस झाला आहे. लातूर, औसा, रेणापूर, अहमदपूर, चाकूर, उदगीर, निलंगा व शिरूर अनंतपाळ या आठ तालुक्यांनी वार्षकि सरासरी ओलांडली आहे. जळकोट (९२.६६) व देवणी (९४) या दोन तालुक्यांनी अद्याप सरासरी ओलांडलेली नाही.

२८ मंडलांत अतिवृष्टी

लातूर ७२, कासारखेडा ८०, गातेगाव १२५, तांदुळजा ७०, मुरूड ६५, बाभळगाव ७०, चिंचोली बल्लाळनाथ ९५, औसा ७०, लामजना ७०, किल्लारी ७२, भादा ७२, किनीथोट ७०, रेणापूर ८५, पोहरेगाव ९०, कारेपूर ८०, खंडाळी ७७, चाकूर ६९, वडवळ ८९, नळेगाव ७३, निलंगा ९०, आंबुलगा ११९, कासारशिरसी ७१, मदनसुरी १०७, औराद शहाजनी ७२, पानचिंचोली १०१, उजेड ८५, साकोळ ७६. सर्वाधिक पाऊस उदगीर तालुक्यातील नागलगाव मंडलात ११८६ मि.मी. इतका विक्रमी झाला असून, सर्वात कमी पाऊस नळगीर मंडलात ५४५ मि.मी. इतका झाला आहे.