पावसाने चार दिवसांची उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या तयारीत शेतकरी असतानाच पुन्हा शुक्रवारी रात्रीपासून दमदार पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची परेशानी वाढली असून शेतमालाची नुकसानी करणाऱ्या या पावसामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

गावोगावच्या पिण्याच्या पाण्याची, चाऱ्याची ददात पावसाने मिटवली खरी, मात्र, हातातोंडाशी आलेला घास पाण्यात जात असल्यामुळे शेतकरी चिंताक्रांत आहे. शुक्रवारी सायंकाळपासून आकाशात ढग जमा झाले अन् रात्री १२ पासून पावसाची संततधार सुरू झाली. लातूर, नांदेड, उस्मानाबाद अशा सर्वच जिल्हय़ात पाऊस सुरू आहे. मांजरा धरणाच्या क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे शनिवारी सकाळी ११ वाजता मांजरा धरणाचे सहा दरवाजे ०.७५ मीटरने उघडण्यात आले आहेत. नदीच्या पात्रात जोमाने पाणी वाढत असल्यामुळे नदीकाठच्या गावच्या लोकांना प्रशासनाने धोक्याचा इशारा दिला आहे. तावरजा, तेरणा, तिरू या नद्याही तुडुंब भरून वाहत आहेत. तेरणा नदीच्या क्षेत्रातील उच्च बंधाऱ्याचे दरवाजे पुन्हा एकदा उघडण्याची वेळ आली. पावसाने यापूर्वीच गावोगावच्या रस्त्याची दाणादाण उडवली असून अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांची फारच कुचंबणा झाली.

अहमदपूर-थोडगा व अहमदपूर-किनगाव या मार्गावरील वाहतूक शनिवारी सकाळपासून रस्त्यावर पाणी साचल्यामुळे पूर्णपणे बंद करण्यात आली. दुपारनंतर ही वाहतूक सुरळीत झाली. जिल्हय़ातील दहा मंडळात गेल्या २४ तासांत अतिवृष्टी झाली आहे. रेणापूर ९०, पानगाव १०५, वडवळ १११, नळेगाव ७६, झरी ११२ जळकोट ७५, निटूर ७५, पानचिंचोली ८५, शिरूर अनंतपाळ ७५, उजेड ८०.

लातूर व रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उशिरा पाऊस झाल्यामुळे सोयाबीनचा पेरा उशिरा केला होता. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे प्रमाण तुलनेने कमी होते. मात्र शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने या तालुक्यातील शेतकऱ्यांचेही नुकसान वाढले आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनला पावसाचा मोठा फटका बसला आहे.

१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत तालुकानिहाय झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. लातूर २८.८८ (९२१.२५), औसा २७ (९०२.६४), रेणापूर ६९.२५ (१०३६.६५), अहमदपूर ४७.५० (१०१४.९५), चाकूर ७५.२० (११०८.५०), उदगीर २४.२९ (९६४.२७), जळकोट ४९.५० (९३०), निलंगा ४६.१३ (१०१९.६४), देवणी २६.३३ (९१८.६३), शिरूर अनंतपाळ ६६.३३ (१०४३.६४), सरासरी ४६.०४ (९९३.२२). वार्षकि सरासरीच्या १२३.८२ टक्के तर अपेक्षित पावसाच्या १५६.५७ टक्के पाऊस झाला आहे. जिल्हय़ातील दहाही तालुक्याने वार्षकि सरासरीचा टप्पा ओलांडला आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेत अतिवृष्टीच्या अटीचा उल्लेखच नाही

पंतप्रधान पीकविमा योजनेत पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नसíगक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदींचा समावेश आहे. मात्र, अतिवृष्टीचा यात समावेश नाही. त्यामुळे अतिवृष्टी वगळता उर्वरित कारणांसाठी पिकाचे नुकसान झाल्यास संबंधित शेतकऱ्याने पीकविमा कंपनीला ४८ तासांच्या आत कल्पना देऊन त्यानंतर पंचनामे करून घेतले पाहिजेत. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे हे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीसाठी सुरू असून पीकविम्याशी या पंचनाम्याचा कुठलाही संबंध नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नारायण उबाळे यांनी सांगितले. पीक कापणीचे प्रयोग मंडलनिहाय केले जाणार आहेत. यात महसूल विभाग, कृषी विभाग व जिल्हा परिषद हे तीन घटक सहभागी आहेत. पीक कापणीचा प्रयोग अतिशय पारदर्शी राहणार आहे. या प्रयोगात ५० टक्क्य़ांपेक्षा उत्पादनात अधिक घट असेल तर पीकविमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई त्या मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेतही मूलभूत त्रुटी शिल्लक असून जोपर्यंत किमान गावनिहाय पर्जन्यमापक यंत्र बसवून गाव हे घटक मानले जाणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या नुकसानीचा नक्की अंदाज लावता येणार नाही. ढोबळ अंदाजातून शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व त्याला मिळणारे विमा संरक्षण यात कमालीची तफावत राहणार आहे.