चार मंडळांत १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद

तब्बल २६ दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मंगळवारी मध्यरात्रीनंतर पावसाने दमदार पुनरागमन केले. वार्षकि सरासरीच्या तुलनेत ३०.३० मिलीमीटर पाऊस झाला. नांदेड तालुक्यात तर अतिवृष्टी झाली. आठ मंडळांपकी ४ मंडळांत १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. जिल्ह्य़ात सर्वदूर चांगला पाऊस झाला.

ऑगस्टच्या सुरुवातीला दोन दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्यानंतर ४ तारखेपासून पावसाने तोंड फिरवले. तत्पूर्वी नियमित झालेल्या पावसामुळे शेतात तण वाढले होते. त्यामुळे पावसाने दिलेली ओढ शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडली. शेतातील िनदणी, खुरपणीची कामे वेगाने आटोपण्यात आली. परंतु, आठ दिवसांनंतर उन्हाळ्यासारखे ऊन तापू लागले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांमुळे २५ दिवसांपर्यंत पिके तगली, पण त्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसू लागले. मूग काढणीला आलेले असताना आणि कापूस, सोयाबीन, तूर ऐन भरात असताना पावसाची फिरलेली लहर पुन्हा नापिकीला जन्म देते की काय, अशी भीती व्यक्त होत होती.

दरम्यान, मंगळवारी सूर्याने पूर्वा नक्षत्रात प्रवेश केला आणि लगोलग पावसाचेही पुनरागमन झाले. रात्रीपर्यंत पावसाची कसलीही चिन्हे नव्हती. मात्र, मध्यरात्रीनंतर अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस जिल्ह्य़ात सर्वदूर कमीअधिक प्रमाणात झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. पोळा सणाच्या पूर्वरात्री पडलेल्या या पावसाने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.

जिल्ह्य़ातील ११ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पकी नांदेड तालुक्यातील आठपकी सात मंडळांत अतिवृष्टी झाली. जिल्ह्य़ात या पावसाळ्यात आजवर ६९.७३ टक्के पाऊस झाला असून, नांदेड तालुक्यात सर्वाधिक ९६.५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुदखेड १४, अर्धापूर १९.६७,  भोकर ११.२५, उमरी १५, कंधार ३३.१७, लोहा ४०.६७, किनवट ७, माहूर १७.२५, हदगाव २९.२९, हिमायतनगर १८, देगलूर २९, बिलोली ५१.४०, धर्माबाद २६.६७ नायगाव ५८ आणि मुखेड तालुक्यात १७.८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.