परंडा येथे हजरत ख्वाजा बद्रोद्दीन शहीद उरुसानिमित्त सोमवारी रात्री काढण्यात आलेल्या फुलांच्या चादर मिरवणुकीत नगरसेवक जाकीर सौदागर यांचा सत्कार का केला नाही, या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. मिरवणुकीतच हाणामारी झाल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने पटापट बंद करून घर गाठले. दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती हाताळत तीन जणांना अटक केली. दोन्ही गटांतील २१ जणांवर गुन्हा दाखल झाला. अजून १८ जण फरारी आहेत.
सोमवारी रात्री ८ वाजता झोपडपट्टी भागातील काही तरुणांनी फुलांच्या चादरची मिरवणूक काढली. ही मिरवणूक आझाद चौकात आली असता या ठिकाणी दोन गट आमने-सामने आले. काठय़ा-दगडाने हाणामारी सुरू झाली. ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. मिरवणुकीत काही तरुणांचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक जाकीर सौदागर यांचा सत्कार का केला नाही, म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन शहरात लावलेले बॅनर फाडून दगडफेक केली, अशी फिर्याद असीफ वजीर शेख याने दिली. दुसऱ्या गटातील जुबेर ऊर्फ गब्बू इस्माईल सौदागर यांनी फुलांच्या चादरीची मिरवणूक दग्र्याच्या दिशेने जात असताना आझाद चौकात मिरवणूक अडवली व लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
उरुसानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी असीफ वजीर शेख, अजहर चाँदपाशा शेख, जुबेर ऊर्फ गब्बू इस्माईल सौदागर यास अटक केली. जुबेर इस्माईल सौदागर यांनी दिलेल्या फिर्यादीत आरोपी असीफ वजीर शेख, वजीर शेख, अजहर चाँदपाशा शेख, जावेद शेख, राजू शेख, लतीफ शेख, गौस शेख, तौफीक मुजावर, मुस्तफा मुजावर, तर असीफ वजीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत आरोपी साबेर इस्माईल सौदागर, जुबेर इस्माईल सौदागर, करीम साबेर सौदागर, मोहसीन जाकीर सौदागर, शहेबाज अजू सौदागर, गब्बू फाजील सौदागर, अब्दुल सौदागर गब्बू, कालू सौदागर, बा. जाकीर सौदागर, माजी सत्तार सौदागर, सत्तार रहेमोद्दीन सौदागर यांच्यावर परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.