सेनगाव गर्भपात औषध प्रकरण

सेनगाव येथील जय गजानन मेडिकलवर अन्न व औषधी विभागाच्या पथकाने छापा टाकून गर्भपाताच्या किटसह ९ लाखांचा अवैध औषधसाठा जप्त केला होता. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला. १४ दिवसांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. मात्र, ज्या औषधी दुकानाची पथकाने ५ तास तपासणी केली होती. त्याच दुकानातून पुन्हा आरोपीने ४५ गर्भपाताची किटस् काढून दिली.

जिल्ह्यात सेनगाव येथील जय गजानन मेडिकल दुकानावर अन्न व औषधी पुरवठा विभागाच्या पथकाने ६ एप्रिल रोजी जय गजानन मेडिकलवर छापा घालून गर्भपाताच्या ५०० किटस्च्या बॉक्समधील ४०७ किटस्सह ९ लाख ५ हजारांचा इतर औषधसाठा सापडला होता. विशेष म्हणजे या पथकाने पोलिसांसमक्ष आरोपीच्या औषधी दुकानासह घराची पाच तासांवर झाडाझडती घेत तपासणी करून माल जप्त केला. आरोपी महेश जेथलिया विरुद्ध सेनगाव पोलिसात रीतसर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता.

गर्भपाताच्या किटस्सह इतर औषधसाठा पोलिसांनी जप्त केला. दरम्यान आरोपी खुद्द घटनास्थळी हजर होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाल्याने अन्न व औषधी विभाग व पोलीस विभागाच्या तपास कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे हे प्रकरण जिल्हाभर चच्रेत आले. मुद्देमाल आरोपी समक्ष जप्त करून गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार कसा होतो, असा प्रश्न विचारला जात होता. आरोपीने िहगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. अटकपूर्व जामीन फेटाळल्याने आरोपीला अटक करण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे टाकले होते. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी मोरे यांच्याकडे होता. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तपासाचे काम पोलीस निरीक्षक सुनील रसाळ यांच्याकडे आले. त्यांनी १४ दिवसांनंतर अकोला जिल्ह्यतील पातूर येथून आरोपीला अटक केली. जिल्हा व सत्र न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपी महेश जेथलियाला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने तो पोलिसांच्या ताब्यात आहे. नव्याने तपासाचे काम हातावर घेतलेल्या पो.नि. सुनील रसाळ यांनी आरोपीच्या औषध दुकानाची पुन्हा शनिवारी झाडाझडती घेतली. पहिल्या पाच तासांच्या तपासात शोधूनही न सापडलेल्या ४५ गर्भपाताच्या किटस् खुद्द आरोपीने पोलिसांना काढून दिल्या. या प्रकारामुळे सुरुवातीचे तपास काम संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ६ एप्रिलला अन्न व औषधी विभागाचे पथक व पोलिसांनी ५ तास दुकान व निवासस्थानाची झाडाझडती घेतली. दरम्यान गर्भपाताच्या ५०० किटस्च्या डब्ब्यात ४०७ किटस् आढळून आल्या. तेव्हा खरेदी केलेल्या ५०० पकी ९३ गर्भपाताच्या किटस्ची विक्री आरोपीने केल्याचे निष्पन्न झाले होते. त्या किटस् कोणाला विकल्या. याचा तपास महत्त्वाचा असताना त्या आधीच १४ दिवसांनंतर त्याच दुकानातून सापडलेल्या गर्भपाताच्या ४५ किटस् मिळाल्या आहेत.