औरंगाबाद शहरातून विविध गुन्ह्यांच्या आरोपांखाली दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार करण्यात आलेले असतानाही साथीदारांच्या मदतीने घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील त्रिमूर्ती चौकातून आज अटक केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, विजय सुभाष बिरारे असे आरोपीचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. शहरात वाढते गु्न्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विजय बिरारे याला पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. मात्र, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून तो बेकायदा शहरात वास्तव्य करीत होता. तसेच आपल्या साथीदारांच्या मदतीने गुन्हेगारी कारवाया करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

चोरीची एक मोटारसायकल शहरातील त्रिमूर्ती चौकात विकण्यासाठी बिरारे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांना मिळाली होती. खबऱ्याने दिलेल्या या माहितीच्या आधारे त्रिमूर्ती चौकात सापळा रचून आरोपी बिरारे याला पोलीस पथकाने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून पाडेगाव येथील कासलीवाल तारांगण येथून चोरलेली दुचाकी जप्त केली आहे. शिवाय १ ऑक्टोबर रोजी व्यंकटेशनगर येथे घरफोडी केल्याची कबुलीही त्याने दिली आहे. आरोपी बिरारेकडून अजूनही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.