दुनिया मे आकर कमाया खूब,
क्या हिरे, क्या मोती…
मगर कफन को जेब नही होती..

हे वाक्य मनाच्या कोपऱ्यात गडद अक्षरात लिहून एक अवलिया समाजातील वाईट विचारांना कीर्तनातून ‘कात्री’ लावतोय. इतकेच नाही तर समाजसेवेचा वसा घेतलेला हा तरुण परंपरागत ‘वस्तरा’ही तितक्याच कौशल्याने चालवत आहे. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे त्याचा आदर्श आहेत. केशकर्तनालय चालवत त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्याचा घरगाडा चालतो. कधी रुग्णालयात जीवन मरणाच्या दारात अडकलेल्याना मदतीचा हात देतो. तर कधी घर चुकलेल्या निराधारांना त्याच्या परीने मायेचा आधार देण्याचा प्रयत्न करतो. शाळेत जाऊन सातवीपर्यंत शिक्षणाचे धडे गिरवलेल्या अवघ्या पंचविशीतल्या सुमितची ही गोष्ट.

सिल्लोड तालुक्यातील अंभई हे सुमितचे गाव. सध्या तो औरंगाबादमध्ये राहतो. घरी चार एकर कोरडवाहू शेती आणि घरात खाणारी तोंडं जास्त. त्यामुळे घरात मोठ्या असलेल्या सुमितला वडिलांना मदत करावी लागायची. त्यामुळे तो पारंपरिक व्यवसाय असलेल्या केशकर्तनालय दुकानात काम करू लागला. परिस्थितीमुळे कदाचित सातवीतच त्याची शाळा सुटली असती. मात्र गुरुजनांनी पाठीवर लढ म्हणून हात ठेवल्याने तो बारावी पास झाला. प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षणाचे धडे गिरवलेला त्याचा सातवीच्या वर्ग शेवटचा. त्यानंतर फक्त परीक्षा देण्यासाठीच तो शाळेत गेला. वर्गात हुशार असलेल्या सुमितला घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेताना दुकानावर काम करायला लागायचे. पैसे कमी पडायचे म्हणून कामाचे तास वाढले. पर्यायाने शाळेकडे दुर्लक्ष होतं गेलं. सातवीच्या वर्गातून शाळा सुटते की काय अशी परिस्थिती होती. वर्गात बऱ्यापैकी हुशार असलेल्या सुमितच्या परिस्थितीची शिक्षकांना कल्पना होती. त्यामुळं त्याच्या पाठीवर त्यांनी लढ म्हणून हात ठेवला.

असेच एकीकडे दुकान, घर चालवत तो दहावी आणि बारावीही झाला. दरम्यान शिक्षकांच्या मदतीने स्वतःचे केशकर्तनालयही सुरु केले. मात्र बारावीनंतर घरच्यांनी लग्न लावून दिल्यानं शिक्षण थांबलं. लग्नानंतर त्याला मुलगी झाली आणि त्याने मुलींसाठी काहीतरी करण्याचा विचार केला. पत्नीच्या साथीने त्याने काम करण्यास सुरुवात केली. ज्यांना मुलगी होईल अशा पित्याची दाढी आणि कटींग एक महिना २१ दिवस मोफत करून द्यायचं त्यानं ठरवलं. सोबत मुलीच्या आई वडिलांचा सत्कार आणि सुकन्या योजनेतून पोस्टात मुलीच्या नावाचं खात उघडून त्यात २८१ रुपये भरण्याचा उपक्रम सुरु केला. आतापर्यंत ४७ जणांनी सुमितच्या या योजनेचा लाभ घेतला आहे.

याबरोबरच सुमितनं ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतलीय. त्यासाठी कर्ज काढून त्यानं जनजागृती करणारी पोस्टर छापली आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून मुलींच्या जन्माचं महत्व तो पटवून देतो. या कामात पत्नी पूजाची खंबीर साथ असल्याचं सुमित आवर्जून सांगतो. स्त्री जन्माचा जागर सुरु असताना सुमित रुग्णसेवेचा वसा त्यानं हाती घेतलाय. रक्तदान शिबीर घेऊन त्यात रक्तदान करणाऱ्यांचीही तो एक महिना एकवीस दिवस मोफत दाढी आणि कटींग करतो. निराधार लोकांचीही दाढी आणि कटींग मोफत करुन देण्याचं काम सुमित अतिशय आनंदाने करत आहे. या कामातून आनंद मिळतो आणि जगण्यासाठी तो पुरेसा असल्याचं सुमित सांगतो.