पीकविमा कंपनीने रब्बी हंगामातील नुकसानीपोटी पाठवलेले २८ कोटी रुपये पंधरा दिवसात शेतकऱ्यांना वाटप करणे आवश्यक असताना जिल्हा बँक संचालक मंडळाने ‘हातचलाखी’ करत पीकविम्याचे पसे थेट कर्ज फेडण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्ज खात्यात जमा केले. पाच वर्षांपासून हक्काचे पाच दहा हजार रुपये ठेवीदारांना बँकेचे उंबरठे झिजवूनही मिळत नाहीत. असे असताना अध्यक्षांच्याच संबंधित असलेल्या द्वारकादास नागरी सहकारी बँकेच्या एक कोटी रुपयांच्या ठेवी मात्र परत केल्या आहेत. याप्रकरणी दोषी संचालक व अधिकाऱ्यांविरुध्द कार्यवाही करावी अशी मागणी अॅड. अजित देशमुख यांनी केली आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आíथक दिवाळखोरीत आल्यानंतर पाच वर्षांपूर्वी बंद पडली. तत्कालीन संचालक मंडळाला गरव्यवहारप्रकरणी जेलची वारीही करावी लागली. वर्षभरापूर्वी भाजपच्या नेत्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ निवडून आल्यानंतर माजी अध्यक्ष सुभाष सारडा यांचा मुलगा आदित्य सारडा यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. सुरुवातीला संचालक मंडळाने जिल्हा बँकेला आíथक डबघाईतून बाहेर काढून सुरळित करण्याचे दावे केले. हातचलाखी करत कागदोपत्री बँक नफ्यात असल्याचेही दाखवले. मात्र मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विम्याच्या आलेल्या पशावरच आपला डाव साधत असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला पीकविम्याचे अडीचशे कोटी रुपये चक्रांकीत ठरावाद्वारे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये गुंतवून व्याज मिळवले. आता तर रब्बी हंगामातील नुकसानभरपाईपोटी आलेले २८ कोटी रुपये थेट जिल्हा बँकेने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी महाराष्ट्र बँकेच्या कर्ज शाखेत भरून टाकण्यात आले आहे. १२ जानेवारीला आलेली पीकविम्याची रक्कम पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना वाटप करणे बंधनकारक असताना बँकेने परस्पर कर्ज खात्यात भरून टाकली आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी पीकविम्याचे पसे मिळतील याकडे डोळे लावून बसलेले असतांना शेतकऱ्यांच्याच पीकविम्यावर बँकेने डल्ला मारला. दुसरीकडे पाच वर्षांपासून जवळपास सहा लाख ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. पाच ते दहा हजार रुपयांची रक्कमही बँकेतून मिळत नाही. ऊसतोड मजूर, कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी यांना औषधोपचारासाठी, शेतकऱ्यांना मुलींच्या लग्नासाठी रक्कम मिळावी यासाठी बँकेचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र एक दमडाही मिळत नाही. अशा परिस्थितीत बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांचे वडील सुभाष सारडा अध्यक्ष असलेल्या द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या एक कोटी रुपयांच्या ठेवी ५ जानेवारी व ४ फेब्रुवारी २०१६ ला दोन टप्प्यात परत केल्या. संचालक मंडळ पुढील प्रमाणेच आपला स्वार्थ साधण्यासाठीच बँकेचा उपयोग करत असून याही संचालक मंडळावर नेतृत्वाचे नियंत्रण नसल्याचे यातून दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पसे कर्ज खात्यात भरल्याप्रकरणी संबंधितांविरुध्द तत्काळ कार्यवाही करावी अन्यथा या प्रकरणी न्यायालयात दाद मागू, असा इशारा अॅड. अजित देशमुख यांनी दिला आहे.